मुंबई : औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या मुंबई विभागातील २७ महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचे उघडकीस आले असून त्यात ठाण्यातील सर्वाधिक १५ महाविद्यालयांचा समावेश आहे. राज्यातील फार्मसी महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याप्रकरणी तंत्र शिक्षण संचालनालयाने ऑगस्टमध्ये नोटीस पाठविलेल्या १७६ महाविद्यालयांची यादी नुकतीच जाहीर केली.
राज्यात २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यात राज्यात पदवी अभ्यासक्रमाच्या ९२ तर पदविका अभ्यासक्रमाच्या २२० महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली होती. मात्र या महाविद्यालयांमध्ये भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेच्या (पीसीआय) निकषांप्रमाणे आवश्यक सुविधांचा अभाव अससल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या माध्यमातून तपासणी केली असता पदवी अभ्यासक्रमाच्या ९२ पैकी ४८ आणि पदविक अभ्यासक्रमाची २२० पैकी १२८ महाविद्यालये पात्रतेचे निकषच पूर्ण करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यात अग्निसुरक्षा प्रमाणपत्रच नसणे, भोगवटा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळांची संख्या कमी असणे, भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी कर्मचारी संख्या असणे अशा अनेक गोष्टी आढळून आल्या होत्या. त्यामुळे या सर्व महाविद्यालयांना तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत ऑगस्टमध्ये नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावलेल्या महाविद्यालयांची यादी नुकतीच तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई विभागातील २७ महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात पदवी अभ्यासक्रमाच्या १४ तर पदविका अभ्यासक्रमाच्या १३ महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई विभागातून सर्वाधिक सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांची संख्या ठाणे जिल्ह्यात १५ आहे. त्यात पदवीच्या सात तर पदविका अभ्यासक्रमाची आठ महाविद्यालये आहेत. त्यानंतर पालघरमध्ये पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे पाच महाविद्यालय, रायगड व रत्नागिरीमध्ये प्रत्येकी तीन महाविद्यालये, तर सिंधुदुर्गात एका पदवी महाविद्यालयामध्ये सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये सर्वाधिक महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव
पीसीआयच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या राज्यातील १७६ महाविद्यालयांमध्ये छत्रपती संभाजी नगरमधील सर्वाधिक ६० महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यात पदविका अभ्यासक्रमाची ५५ तर पदवीची पाच महाविद्यालये आहेत. त्याखालोखाल नागपूरमध्ये पदविका अभ्यासक्रमाची ३९ तर पदवीच्या तीन अशी एकूण ४२ महाविद्यालये आहेत. मुंबईमध्ये २७, पुण्यामध्ये पदविकेची २१ व पदवीची ६ अशी २७ महाविद्यालये आहेत. तसेच नाशिकमध्ये १६ व अमरावीमध्ये चार पदवी महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई विभागातील महाविद्यालये
जिल्हा | पदवी | पदविका |
ठाणे | ७ | ८ |
रायगड | २ | १ |
पालघर | २ | ३ |
रत्नागिरी | २ | १ |
सिंधुदुर्ग | १ | ० |