मुंबई : मालाडच्या मालवणी चर्च परिसरातील निर्जन जागेत एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या महिलेची ओळख पटली असून ती चारकोप येथे राहणारी आहे. ती पूर्वी बारबाला म्हणून काम करत होती. मालवणी पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर गुरूवारी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मालाड पूर्वेच्या मालवणी येथे जुने चर्च आहे. त्या चर्चजवळील निर्जन जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडजवळील झुडपात बुधवारी एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मालवणी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

गळा दाबून हत्या केल्याचा संशय

या महिलेची ओळख पटविण्यासाठी तिची छायाचित्रे परिसरातील पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली होती. गुरूवारी दुपारी तिची ओळख पटली. या महिलेचे नाव राणी शुक्ला (४०) असून ती कांदिवलीच्या चारकोप यथ आई आणि १३ वर्षांच्या मुलीसह राहते. ती पतीपासून विभक्त झाली आहे. पूर्वी बारबाला म्हणून काम करत होती. सध्या महिलेच्या कुटुंबियांकडून आणि परिचितांकडून माहिती गोळा केली जात आहे.

हत्येचा गुन्हा दाखल

मृतदेहावर जखमांच्या कोणत्याही खुणा स्पष्टपणे दिसून आल्या नव्हता. त्यामुळे बुधवारी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी हत्या करून मृतदेह तेथे आणून टाकल्यची शक्यता आहे. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासत आहोत. आरोपी याच भागातील असल्याची शक्यता आहे. लवकरच आरोपीला अटक करू असे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले.