लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होत आले असून नूतनीकरण केलेले ४९० खाटांचे रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गोरेगावपासून थेट पालघरपर्यंतच्या नागरिकांना पुन्हा एकदा आरोग्य सुविधा मिळू शकणार आहेत. बहुविशेषता असलेले हे रुग्णालय ३० वर्षांसाठी चालवण्यासाठी खासगी संस्थेकडे देण्यात येणार आहे. त्याकरीता पालिकेने निविदा मागवल्या असून त्यासाठी ४५ कोटी खर्च येणार आहे.

परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खाजगी भागिदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) धोरण अवलंबण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतची आगामी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. या धोरणाला आधीच शिवसेना (ठाकरे) प्रणित कामगार सेनेने विरोध दर्शवला आहे. मात्र पालिका प्रशासन आपल्या धोरणावर ठाम असून पालिकेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी मानखुर्दमधील रुग्णालय चालवण्यासाठी व व्यवस्थापनासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागितले होते. त्यापाठोपाठ आता बोरिवलीच्या भगवती रुग्णालय चालवण्यासाठी संस्था नेमण्याकरीता निविदा मागवल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभागासाठी सार्वजनिक खाजगी भागिदारी धोरण आणण्याचे ठरवले आहे. मुंबई महापालिकेची विविध रुग्णालये, प्रसूतीगृहे दवाखाने ३० वर्षांपर्यंत प्रचलन व परीरक्षण करण्याकरिता म्हणजेच या आरोग्य सेवा चालवण्याकरिता इतर संस्थांकडे ३० वर्षाकरिता दिले जाणार आहेत. मानखुर्द येथील लल्लूभाई अमीचंद कंपाऊंड येथील नवीन रुग्णालय, बोरिवलीचे भगवती रुग्णालय, बोरिवलीतील पंजाबी गल्ली चिकित्सा केंद्र (डायग्नॉस्टिक सेंटर) येथे या पद्धतीने संस्था नेमल्या जाणार आहेत.

भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकास व पुनर्बांधणीसाठी २००९ मध्ये मंजुरी प्राप्त झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०१० मध्ये भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन होऊन नवीन इमारतीच्या बांधकामास सुरूवात झाली. भगवती रुग्णालयाच्या संरचनात्मक तपासणीमध्ये मुख्य इमारत धोकादायक असल्याचे आढळून आल्यामुळे भगवती रुग्णालयातील सेवा सुविधा कांदिवली येथील नव्याने बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे ४ ऑक्टोबर २०१३ पासून स्थानांतरित करण्यात आल्या. रुग्णांची गैरसोय होऊ नये यास्तव भगवती रुग्णालयात अपघात विभाग सुरू ठेवण्यात आला होता.

भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या नर्सिंग ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीमध्ये रुग्ण सेवेकरिता ११० रुग्णशय्येचा वैद्यकिय विभाग जुलै २०१६ पासून सुरू करण्यात आला आहे. पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात ४९० रुग्णशय्येचे अत्याधुनिक उच्चस्तरीय रुग्णालय अतिविशेष सेवांसह सुरू करण्यात येणार आहे. ज्यायोगे पश्चिम उपनगरांतील नागरिकांना विशेष आणि अतिविशेष वैद्यकिय उपचार सुविधा घराच्या जवळ उपलब्ध होतील. जेणेकरून महापालिकेच्या वैद्यकिय महाविद्यालयांशी संलग्न के. ई. एम., नायर व शीन रुग्णालयांतील रुग्ण सेवेचा अतिरिक्त भार कमी होईल.

नूतनीकृत रुग्णालयात कोणत्या सुविधा…

१) सर्वसाधारण विभाग आणि विशेष विभाग – मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडीक, पिडियाट्रीक, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, ई. एन. टी., नेत्ररोग, त्वचारोग आणि ईमरजंसी मेडिकल सर्व्हिसेस या विभागांच्या उपचार सुविधा आणि अतिदक्षता विभागांकरिता ३७८ रुग्णशय्या.

२) अतिविशेष विभाग – नेफ्रॉलॉजी, डायलेसीस, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी मेडिसीन व गॅस्ट्रोएंटरॉलॉजी सर्जरी, बर्नस, कार्डियोलॉजी या विभागांच्या उपचार सुविधा आणि अतिदक्षता विभागांकरिता एकूण ११२ रुग्णशय्या.

३) अत्याधुनिक मोड्यूलर ऑपरेशन थिएटर, मेजर व मायनर ओ.टी. आणि कॅथ लॅब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरिलाल भगवती रुग्णालयाविषयी ….

कै. हरिलाल भगवती यांनी १९६२ मध्ये रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मंडपेश्वर रोड, बोरिवली (पश्चिम) येथील जागा देणगी स्वरुपात दिली. या जागेवर रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करून १९६८ साली ५० रुग्णशय्येच्या २ कक्षाचे हरीलाल भगवती रुग्णालय सुरू झाले. पश्चिम उपनगरांतील नागरिकांना वैद्यकिय उपचार सुविधांचा लाभ मिळावा याकरिता ५० रुग्णशय्येपासून ३७३ रुग्णशय्येपर्यंत भगवती रुग्णालयाचा विस्तार झाला.