मुंबई : पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने छत्तीसगडमधील शिक्षण संस्थेच्या सचिवाला नुकतीच अटक केली. महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाची रक्कम बनावट धनादेशाद्वारे हस्तांतरित करण्यात आली होती. त्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अरुणोदय शिक्षण समितीचे सचिव हेमशंकर जेठमल (४७) यांना नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेच्या जनरल चिटींग-१ कक्षाने छत्तीसगड येथून अटक केली. या प्रकरणात सहाय्यक कामगार आयुक्त अशोक डोके यांनी तक्रार केली होती. तक्रारीनुसार, त्यांच्याकडे महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. या मंडळाच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे पाच कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार डोके यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती.

हेही वाचा: मुंबई: शिंदे सरकारच्या प्रभागसंख्या २२७ करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; बुधवारी होणार तातडीची सुनावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बोर्डाच्या अंतर्गत असंरक्षित कामगार कल्याणाचे काम सोपविण्यात आले आहे. मंडळाच्या अखत्यारितील रक्कम एका राष्ट्रीकृत बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले होते. गेल्या महिन्यात मंडळाचा हिशेबनीस व त्याचा सहकारी बँकेच्या मशीद बंदर येथील शाखेत गेले. त्यावेळी पासबूक नोंदीनुसार त्यात खात्यात पाच कोटी सहा लाख रुपये कमी असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली असता ७ जानेवारी ते २ मार्च २०२१ या कालावधीत बनावट धनादेशाद्वारे रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. आठ बनावट धनादेशांद्वारे ही रक्कम मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. तेथील कंपन्या, शिक्षण संस्थांची बँक खाती यात पाच कोटी रुपये जमा झाले होते. याप्रकरणी संशयीत व्यवहारांची माहिती बँकेकडून मिळवण्यात आली. त्यात जेठमल याच्या कंपनीच्या खात्यावर ८० लाख २० हजार रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी दोन बनावट धनादेशांचा वापर करण्यात आला होता. ती रक्कम काढून सहआरोपीला देण्यात आल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे. याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.