करोनामुळे मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसेंदिवस करोना बाधितांच्या आकड्यात भर पडू लागली आहे. करोनाचा प्रसार अजून नियंत्रणात आलेला नसून, गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिगच्या नियमाचं पालन व्हावं म्हणून पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. अशात पोलिसांनीच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे आणि गुन्हा दाखल करण्याच कारण म्हणजे हे सहा पोलीस कर्मचारी ड्यूटीवरच येत नव्हते.

आणखी वाचा- मोठी बातमी : मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू

बोरिवली पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहा पोलीस कॉन्स्टेबल मागील दोन महिन्यांपासून गैरहजर आहेत. करोनामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आला आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचाही संसर्ग झाला आहे. अशा स्थितीत हे पोलीस कर्मचारी सातत्यानं गैरहजर राहत आहेत. याप्रकरणी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही ते ड्यूटीवर हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासनानं यावेळी त्यांच्या गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा- मुंबईतील करोना मृत्यूदर वादात!

मुंबईत ९०३ नवे बाधित, ३६ जणांचा मृत्यू

मुंबईत मंगळवारी (३० जुलै) आणखी ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७७ हजाराच्यापुढे गेली आहे. तर ४८ तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४५५४ वर गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रोज हजार ते दीड हजार रुग्णांची रोज भर पडत असताना मंगळवारी बाधितांची संख्या काहीशी कमी झाली. ९०३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७७,१९७ झाली आहे. तर ६२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ४४,१७० म्हणजेच ५७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २८,४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी ८१८ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.