मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवी शिक्षणशास्त्र (बीएड) अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बीएड अभ्यासक्रमाच्या राज्यातील ४८३ महाविद्यालयातील ३६ हजार ६९८ जागांपैकी ३३ हजार ८७७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. प्रवेशाची टक्केवारी ९२.३१ टक्के एवढी आहे. सलग तिसऱ्या वर्षी मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त असून यावर्षी ७३.०७ टक्के मुलीनी प्रवेश घेतला.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी २५ जून ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पदवी शिक्षणशास्त्र प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. बीएड अभ्यासक्रमाच्या राज्यातील ४८३ महाविद्यालयातील ३६ हजार ६९८ जागांपैकी ३३ हजार ८७७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. प्रवेशाची टक्केवारी ९२.३१ टक्के एवढी आहे. या प्रवेशांपैकी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ३४ हजार १७० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ३२ हजार ६४३ जागांवर प्रवेश झाले. हे प्रमाण ९५.५३ टक्के इतके आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (इडब्ल्यूएस) २ हजार ५२८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ हजार १८० जागा भरल्या असून १ हजार ३८० जागा रिक्त राहिल्या आहेत. म्हणजेच यंदा या प्रवर्गातून ४६.६७ टक्के प्रवेश झाले आहेत. तर ५३.३३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्या असून संस्थात्मक फेरीसह चार फेऱ्यात हे प्रवेश झाले आहेत.
मागील तीन वर्षांमध्ये महाविद्यालयांच्या संख्येत वाढ झाल्याने जागांमध्येही वाढ झाली. जागा वाढल्या असल्या तरी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे जागा रिक्त राहण्याचे प्रमाणही कमी आहे. २०२३ -२४ मध्ये ३४ हजार २४० जागांपैकी ३० हजार ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यावरून ८७.७३ टक्के जागा भरल्या होत्या. तर ४ हजार २०२ जागा रिक्त राहिल्या होत्या. जागा रिक्त राहण्याचे प्रमाण १२.२७ टक्के होते. त्याचप्रमाणे २०२४-२५ मध्ये ३६ हजार ४३३ जागांपैकी ३३ हजार जागांवर प्रवेश झाले होते. हे प्रमाण ९०.७६ टक्के, तर २०२५-२६ मध्ये ९५.५३ टक्के प्रवेश झाले, तर जागा रिक्त राहण्याचे प्रमाण ७.६९ टक्के इतके होते.
सलग तिसऱ्या वर्षीही मुलींची संख्या जास्त
मागील तीन वर्ष पदवी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमासाठी २०२३ – २४ मध्ये २२ हजार ३२७, तर २०२४-२५ मध्ये २४ हजार ७०४ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. तसेच या अभ्यासक्रमासाठी २०२५ -२६ मध्ये २४ हजार ७५६ मुलींनी प्रवेश घेतला आहे.
पदवीनंतर शिक्षणशास्त्र (बीएड) क्षेत्रात करियर करण्याकडे विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ९२ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यावर्षी प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या असून ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली. – दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सीईटी कक्ष
