जादूटोणा केल्याची बतावणी करून एका महिलेने घरातून ६० हजार रुपये किंमतीच्या दागिन्याची चोरी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घाटकोपरच्या पंतनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून धुळे जिल्ह्यातून एका दाम्पत्याला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपरमधील पंतनगर परिसरात वास्तव्याला असलेल्या अनिता महाडिक यांच्या घरी १५ दिवसांपूर्वी एक अनोळखी महिला आली होती. घरात कोणीतरी जादूटोणा केल्याची बतावणी करीत तिने महाडिक यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर तिने घरातील ६० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरून पोबारा केला. ही बाब महाडिक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.

हेही वाचा: संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपाणी करून पोलिसांनी आरोपी महिलेची ओळख पटवली. या घटनेनंतर ही महिला धुळे जिल्ह्यातील तिच्या गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिचे गाव गाठले आणि तिचा शोध सुरू केला. गावात भरलेल्या यात्रेत आरोपी महिला मिनाबाई गोंड (४०) आणि पती रवी गोंड (४५) छायाचित्रांची विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोन दिवस या दोघांवर पळत ठेवली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A couple who stole gold ornaments from their house by pretending to be witchcraft was arrested mumbai print news tmb 01
First published on: 03-12-2022 at 16:54 IST