मुंबई : सांताक्रूझ (पूर्व) येथील सीएसटी रोडवरील ‘विंडसर’ इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी सकाळी ६ वाजता आग लागली. सुमारे एक ते दीड हजार चौरस फूट जागेत ही आग पसरली होती.

मुंबईमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच असून सांताक्रूझ येथील ‘विंडसर’ इमारतीत बुधवारी पहाटे आग लागली. या आठ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती. या आगीत विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे, फर्निचर, लाकडी सामान, सर्व्हर पॅनल, बॅटरी पॅनल व कार्यालयीन दस्तऐवज जळून खाक झाले. आग सुमारे एक हजार ते दीड चौरस फूट परिसरात पसरली होती. संपूर्ण मजल्यावर प्रचंड धूर पसरल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.

घटनेची मााहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग स्तर १ ची असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि विद्युतपुरवठा कपंनीचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेत जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. मुंबईत दोनच दिवसांपूर्वी गोरेगावच्या चित्रनगरीत आग लागली होती. तसेच मरीन लाईन्स येथेही आग लागली होती.

दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाने केल्या या सूचना

१…. घरगुती व व्यावसायिक ठिकाणांवरील विद्युत वाहिन्या, प्लग, स्विच बोर्ड्स आणि उपकरणांची नियमित तपासणी करावी.

२. वापरानंतर पंखे, एसी, टीव्ही, मिक्सर, गीझर, इस्त्री इत्यादी उपकरणे त्वरित बंद करावीत.
३. जुन्या किंवा जीर्ण वायरिंगची तज्ज्ञांच्या मदतीने दुरुस्ती करावी.

४. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारे सर्व मार्ग (जीने, प्रवेशद्वार) कायम मोकळे ठेवावेत.
५. एकाच प्लग सॉकेटमध्ये अनेक विद्युत उपकरणे लावणे टाळावे. ओव्हरलोडिंग टाळून योग्य प्रकारे विद्युत उपकरणे वापरावीत.

६. वातानुकूलित (AC) यंत्रणेची नियमित देखभाल (maintanace) करणे आवश्यक आहे.
७. घरात, दुकानात किंवा कार्यालयात किमान एक ‘फायर एक्सटिंग्विशर’ ठेवावा आणि त्याचा योग्य वापर शिकून घ्यावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८. रात्री झोपताना मोबाईल चार्जिंग किंवा अन्य उपकरणे चालू ठेवणे टाळावे.
९. रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक्स यांनी आवश्यक ती अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळेवर अग्निसुरक्षेचा आढावा घ्यावा