आरेतील आदर्शनगर येथे राहणारा चार वर्षीय मुलगा वडिलांबरोबर गरबा खेळण्यासाठी जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर त्याला तत्काळ ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी नेण्यात आले. घटनास्थळी बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> उपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच!

आदर्शनगर येथील ओल्ड हिल क्वार्टर येथे राहणारा चार वर्षीय हिमांशू यादव वडिलांबरोबर सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गरबा खेळण्यासाठी जात होता. त्यावेळी अचानकपणे बिबट्याने हिमांशूवर उडी मारून हल्ला केला. त्याच्या वडिलांनी आरडाओरड केल्यावर बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात हिमांशू जखमी झाला. यामुळे आरेतील रहिवाशांची भीतीने गाळण उडाली आहे. आरे कॉलनीतील बिबट्याचा मुक्तसंचार लक्षात घेता पाड्यांतील नागरिकांनी जागरूकपणे पहारा सुरू केला आहे. दरम्यान, कोणत्या बिबट्याने हल्ला केला आहे याबाबत माहिती घेण्यासाठी घटनास्थळी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गस्ती पथक देखील तैनात केले आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.