मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. सँडहर्स्ट रोड स्टेशनवर लोकलने चार प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालले होते, त्यावेळी अंबरनाथ फ़ास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं, या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

रेल्वे प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई काय म्हणाले?

पिक अवर मध्ये ट्रेन लेट झाल्या तर गर्दी प्रचंड वाढते. ही भीती मी मगाशीच व्यक्त केली होती. मुंब्रा येथील अपघात झाला होता त्याची कारणं काय याचा अभ्यास करुन अहवाल देणं आवश्यक होतं. पण तसं घडलं नाही. महाराष्ट्र पोलिसांनी सखोल अभ्यास करुन योग्य अहवाल तयार केला होता. प्रवाशांचे मृत्यू होत आहेत ते थांबले पाहिजेत अशीच आमची मागणी आहे. CRMS ने जे आंदोलन अचानकपणे केलं ते चुकीचं होतं. प्रवाशांचे हाल होत आहेत आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले असं सिद्धेश देसाई यांनी म्हटलं आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी काय म्हणाले?

सँडहर्स्ट रोड स्टेशनवर काही प्रवासी चालले होते. त्यांना अंबरनाथ फास्ट ट्रेनने धडक दिली. आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार तिघांना धडक लागली आहे. त्यांना लवकरात लवकर उपचार मिळतील याची काळजी आम्ही घेत आहोत. असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. पीटीआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अचानक आंदोलन सुरु झालं ज्यामुळए वेळापत्रक कोलमडलं

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं. ज्यामुळे लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं. इतकंच नाही तर लोकल ट्रेन उशिरा सुरु झाल्याने सीएसएमटी आणि इतर सगळ्याच मोठ्या स्टेशन्सवर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहण्यास मिळालं. प्रवाशांना आंदोलनाची कुठलीही कल्पना नव्हती. प्रचंड गर्दी झाल्याने अपघात झाला. अंबरनाथ फास्ट लोकलने धडक दिली आणि हा अपघात झाला. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड होत आहेत. या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना बसला आहे. २५ ते ३५ मिनिटे मध्य रेल्वे उशिराने धावत आहेत. CSMT वरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरती वाहतूक उशिराने धावत आहेत. जखमी प्रवाशांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.