लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाला प्रवाशाने मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. आरोपी महिलेला त्रास देत होता, त्याबाबत विचारणा केली असता आरोपीने जवानाला मारहाण केल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपीविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार जवान मयूर बाबराव अजगर (३६) विमानतळावर शुक्रवारी कर्तव्यसाठी तैनात होते. त्यावेळी एक महिला त्याच्याकडे रडत आली. त्यांना एक प्रवासी त्रास देत असल्याचे त्यांनी जवानाला सांगितले. त्यांंनी प्रवाशाकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी प्रवाशाने उद्धटपणे त्याला नकार दिला. त्यावेळी जवानाने तुम्हाला ओळखपत्र दाखवावे लागेल, असे सांगितले असता आरोपी संतापला व तो जवानाच्या अंगावर धावून आला. त्याने जवानाच्या तोंडावर दोन-तीन ठोसे मारले. त्यावेळी जवानाने प्रतिकार करून सहकारी विष्णू प्रसाद यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सीआयएसएफ नियंत्रण कक्षाकडे नेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… ठाकरे गटाचे पैशांवरच लक्ष!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

तेथे तपासणीत आरोपीचे नाव संदीप सिंह असल्याचे निष्पन्न झाले. तो उत्तराखंड येथील रहिवासी असून तो लेहला जात असल्याचे त्याच्याकडील तिकिटावरून स्पष्ट झाले. त्याला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.