मुंबई: विक्रोळी वाहतूक विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना घडली. शंकर कोळसे असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पायाच्या दुखण्याला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
शंकर कोळसे (५६) हे पत्नीसह विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षानगर मध्ये रहात होेते. ते विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत होते. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांना उठविण्यासाठी पत्नी वरच्या मजल्यावर गेली असता त्यांनी घरातील लोखंडी जिन्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पत्नी रंजना कोळसे यांना मध्यरात्री २ वाजता जाग आली होती. तेव्हा त्यांना शंकर कोळसे झोपले असल्याचे दिसले. त्यामुळे रात्री दोननंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्येपूर्वी त्यांनी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. दिड वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यावेळी पायाची शस्त्रक्रिया झाली होती. त्या दुखण्यामुळे ते त्रस्त होते. या आजारपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचे पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.