मुंबई : औरंगाबाद येथे २००६ साली हस्तगत केलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील एका आरोपीला आईच्या मृत्युनंतरच्या विधींना उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन देण्यास मुंबईस्थित विशेष न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. तसेच, प्रत्येक व्यक्तीने आईप्रमाणे मातृभूमीसाठी तेवढेच भावनिक असले पाहिजे, अशी टिप्पणीही विशेष न्यायालयाने हा निर्णय देताना केली.

राष्ट्रीय सुरक्षा प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असली पाहिजे, असेही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन विशेष न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना नमूद केले. आईच्या मृत्युनंतरच्या विधींना उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी मुस्तफा सय्यद उर्फ मुन्ना मुस्तफा याने केली होती. मुस्तफा अटक झाल्यापासून १८ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे.

नोव्हेंबर २००८च्या मुंबई हल्ल्यातील निर्दोष सुटका झालेला आरोपी झैबुद्दीन अन्सारी याच्यासह १२ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने २०१५ मध्ये या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात मुस्तफा सुरूवातीला माफीचा साक्षीदार होता. परंतु, नंतर तो फितूर झाला. त्यामुळे, न्यायालयाने त्याच्यावरील खटला स्वतंत्र केला होता. हा खटला अद्याप प्रलंबित आहे. आईच्या मृत्युनंतरच्या विधींना उपस्थित राहता यावे यासाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्याच्या मागणीसाठी त्याने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या विधींना धार्मिक आणि भावनिक महत्त्व असून त्यासाठी मुलगा या नात्याने आपली उपस्थिती आवश्यक आहे, असा दावाही मुस्तफाने अर्जात केला होता. आरोपींच्या अशा मागण्यांबाबत सौम्यतेने विचार करण्याचे आणि मानवतावादी दृष्टीकोनातून निर्णय देण्याचे आदेश सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांना दिले होते याकडेही मुस्तफाने अर्जात लक्ष वेधले आहे.

तथापि, आरोपीने तात्पुरत्या जामिनासाठी दिलेले कारण सामान्य परिस्थितीत मान्य केले जाते. तथापि, गेल्या १८ वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असलेला मुस्तफा त्याच्या या स्थितीसाठी स्वतःच दोषी आहे, असे विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी त्याची तात्पुरत्या जामिनाची मागणी फेटाळताना नमूद केले. मुस्तफाच्या वर्तनामुळे तो मानवतावादी दृष्टीकोनातून तात्पुरता जामीन देण्यासाठी विचारात घेण्यासही पात्र ठरत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

न्यायालयाचे म्हणणे

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. आरोपी त्याच्या आईच्या निधनाने भावनिक झाला आहे, तर त्याने मदारे वतन म्हणजेच मातृभूमीसाठीही तितकेच भावनिक असले पाहिजे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले. राष्ट्राची सुरक्षा आणि सुरक्षा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची असली पाहिजे. या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती आरोपीला तात्पुरत्या जामिनावरही सोडण्याचा अधिकार देत नाहीत, असेही न्यायालयाने मुस्तफा याला दिलासा नाकारताना स्पष्ट केले.