विक्रोळी पूर्व येथील इमारतीमधील तरण तलावात बुधवारी १९ वर्षीय तरुणाला मृतदेह सापडला होता. त्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाच्या डोक्यावर जखम आहे, तसेच कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विक्रोळी पूर्व येथील सरमळकर चाळीचा पुनर्विकास करण्यात आला असून चाळीच्या जागेवर बहुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. पण गेल्या काही वर्षांपासून इमारतीचे काम अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वाहनतळ परिसरात तरण तलाव आहे. तेथे सुमीत राजेश कांबळे (१९) या तरुणाचा मृतदेह सापडला. तेथील सुरक्षा रक्षकाने बुधवारी प्रथम मृतदेह पाहिला. सुमीत ३ ऑक्टोबरच्या रात्री पासून गायब होता. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ (हत्या) व २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. सुमीतच्या हनुवटीखाली, डोक्यामागे व डाव्या कानाच्या बाजूला जखमा आहेत. सुमीतला मारून त्याला तरणतलावात फेकण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा >>>‘पोडिअमवर मनोरंजन मैदान असूच शकत नाहीʼ; राष्ट्रीय हरित लवादाच्या स्पष्टीकरणाने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरूवातीला सुमीतने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण याप्रकरणी सुमीतचे मामा संदीप नंदकिशोर जाधव (३०) यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सुमीत मामा जाधव यांच्यासोबत विक्रोळी पूर्व येथील स्टेशन रोडवरील बांबुळी चाळीत रहायला होता. तो कोल्हापूर येथील रहिवासी असून नोकरी करीत होता. नवरात्रीत तो मामाकडे आला होता. तक्रारीनुसार, सुमीतला मारहाण करून तरण तलावात फेकून हत्या केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सुरुवातीला विक्रोळी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावर कोणत्याही प्रकारचे सीसी टीव्ही कॅमेरे सापडले नाहीत. याप्रकरणी वैद्यकीय अहवालाबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे विक्रोळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी सांगितले.