आधार कार्ड हा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. कारण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ओळखीचा तो पुरावा आहे. सिम कार्ड असो किंवा बँक खाते उघडायचे असो आधार कार्डची गरज लागतेच. फोन नंबरही आधारशी जोडणे अनिवार्य झाले आहे. फेब्रुवारी २०१८ पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र बँक खात्याशी आधार लिंक करण्यासंदर्भात कोणताही फोन आला तर सावधान! कारण तुम्ही तुमची व्यक्तिगत माहिती उघड केली आणि आधार नंबर दिला तर तुम्हालाही मुंबईतील शाश्वत गुप्ता या तरूणासारखा अनुभव येऊ शकतो.
शाश्वत गुप्ता हा तरूण ‘कोझीकोड’ नावाच्या प्रायव्हेट फर्ममध्ये काम करतो. त्याला काही दिवसांपूर्वी एक फोन आला. आधार कार्ड आणि फोन नंबर जोडून देतो असे सांगत फोनवरच्या ठकसेनाने शाश्वतच्या अकाऊंटमधले १ लाख ३० हजार रूपये लंपास केले. या संदर्भात शाश्वत गुप्ताने एक फेसबुक पोस्ट लिहून आपल्याला आलेला अनुभव सांगितला आहे. ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
शाश्वत सांगतो, मला एक फोन आला, या माणसाने एअरटेल कंपनीचा एजंट असल्याचे सांगितले. तसेच तुमचा मोबाईल आणि सिमकार्ड आधारसोबत लिंक केले नसल्याने कायमचे ब्लॉक झाल्याचे सांगितले. तसेच नंबर रिअॅक्टिव्हेट करायचा असेल तर एअरटेलचा कस्टमर केअर नंबर १२१ वर एक मेसेज पाठवण्यास सांगितले. या माहितीद्वारे फोनवर बोलणारा माणूस माझ्या सिमकार्डचे क्लोन तयार करून माझा बँक बॅलन्स लंपास करेल याची पुसटशीही कल्पना मला आली नाही. काही संकट आलेच तर मी १ लाख ३० हजार रूपये जमा करून ठेवले होते. मात्र ते आता चोरीला गेले, असेही शाश्वतने म्हटले आहे.
या सगळ्या प्रकाराबाबत शाश्वतने तातडीने आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधला. आम्ही तुमची तक्रार नोंदवली आहे आणि तुमचा SR क्रमांक नोंदवून घेतला आहे. आमचे अधिकारी लवकरच तुम्हाला संपर्क करतील असे उत्तर बँकेने दिले. ज्यामुळे शाश्वतने नाराजी व्यक्त केली. शाश्वतची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. शाश्वतने त्याची पोस्ट आयसीआयसीआय बँक, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, रविशंकर प्रसाद, पियूष गोयल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरबीआय या सगळ्यांना टॅगही केली आहे.