ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उभारलेल्या जनआंदोलनाचा लाभ ‘आप’ला झाला असून या पार्टीला बहुमत मिळालेले नाही. ज्या काँग्रेसच्याविरोधात होते, त्याच काँग्रेसचा हात ‘आप’ने सत्तेसाठी हातात घेतला आहे. त्यामुळे ‘आप’ परिवर्तन करू शकणार नाही, असे मत भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात पेंडसे परिवाराच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अरविंद पेंडसे प्रतिष्ठानचे उद्घाटन गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करीत असून ते पतंप्रधान होतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुर्वी त्यांचे भरभरून कौतूक केले आहे. नवी जबाबदारी येईल, तेव्हा ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. आता त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही, असे सांगत मुंडे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रीया दिली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महायुतीविषयी केलेल्या टिकेबाबत मुंडे यांना विचारले असता, नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये कोण विचारते, त्यांना अद्याप मुख्यमंत्री पद मिळालेले नाही, असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला. ठाणे परिवहन सभापती पदाच्या निवडणूकीनंतर ठाणे भाजपामध्ये दोन गटात उघडपणे सुरू असलेल्या वादाविषयी विचारले असता, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ नेते राम नाईक यांची एक सदस्य समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानंतर दोषींवर पुढील कारवाई करण्यात येईल. तक्रारदार दोषी असल्यास त्याच्याविरोधातही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ात पक्ष नेतृत्व नाही
अरविंद पेंडसे व्यक्ती नव्हती तर संस्था होती, त्यांनी जिल्ह्य़ात एक पिढी उभारली. त्यांनी दुसऱ्याला मोठे केले. माझ्या जडणघडणीतही त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असे सांगत पेंडसे यांच्यानंतर जिल्ह्य़ात पक्षाचे एकही नेतृत्व नाही. पेंडसे यांच्यासारखे पाच कार्यकर्ते असते तर राज्यात परिवर्तन घडवू शकलो असतो, अशी खंत मुंडे यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.