लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात व अन्य त्रास होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मुंबईत सुरू करण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने हे सुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा पुरविणे सोपे होणार आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या सुरुवातीच्या टप्प्यातील मतदानावर वाढत्या तापमानाचा परिणाम दिसून येत आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत ९ हजार ८६२ मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात २ हजार ५०९ तर उपनगरात ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : भांडुपमध्ये आढळली तीन कोटींची रक्कम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि दवाखाने येथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे सहज शक्य होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दली.

उष्माघाताचा त्रास होणाऱ्या नागरिकांसाठी ज्या रुग्णालयांमध्ये शीत कक्ष तयार केले आहेत अशा रुग्णालयांची यादी मतदान केंद्रांवर लावण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रांवर उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करता यावेत यासाठी ३ ते ४ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.