मुंबई : समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीशी काडीमोड घेतला असून मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष हा ‘महाविकास आघाडी’बरोबर न लढता स्वतंत्रपणे लढणार आहे, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांनी केली.
समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’ आणि ‘मानखुर्द-शिवाजीनगर’ असे राज्यात दोन आमदार आहेत. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये २२४ पैकी समाजवादीचे अवघे ६ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रीय स्तरावर समाजवादी पक्ष काँग्रेस पुरस्कृत ‘इंडिया आघाडी’चा घटक पक्ष असल्याने राज्यात ‘महाविकास आघाडी’बरोबर पक्षाला राहणे भाग आहे. मात्र ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असणार नाही, असे आझमी यांनी स्पष्ट केले आहे.
वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत राज्यात ‘महाविकास आघाडी’ने समाजवादी पक्षाला एकही मतदारसंघ सोडला नव्हता. महाविकास आघाडीला मुस्लीम मते हवी, मात्र मुस्लीम उमेदवार नको, अशी टीका त्यावेळी आझमी यांनी केली होती. त्याच वर्षी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने १२ जागांची मागणी केली होती. आघाडीने २ मतदारसंघ दिले असताना १२ मतदारसंघात समाजवादीने उमेदवार दिले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आझमी यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचा राज्यातील पाया मुस्लीम मतदार आहे. शिवसेना दुभंगल्यानंतर मुंबईतील मुस्लीम मतदार हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राहिल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसले होते. त्यातच प्रदेशाध्यक्ष अबु आझमी आणि सचिव रईस शेख यांच्यात मागच्या मोठा बेबनाव निर्माण झाला आहे. या पक्षात मराठी मुस्लीम आणि उत्तर भारतीय मुस्लीम अशी दुफळी पडली आहे. अबु आझमी हे उत्तर प्रदेशातील असून आमदार रईस शेख हे मूळचे सातारचे मराठी मुस्लीम आहेत. आमदार रईस शेख हे अनेक वर्षे मुंबई महापालिकेत पक्षाचे गटनेते होते.
मुंबईतील मुस्लीम इलाख्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले मतदान होवू लागल्याने समाजवादीची अडचण झाली आहे. रईस शेख इतर पक्षात जाण्यासाठी धडपडत आहेत तर आझमी सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच एमआयएम आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस उरल्यासुरल्या मुस्लीम मतदारांना गळाला लावण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे आझमी यांनी एकला चलो रे… ची भूमिका जाहीर करत आपण महाविकास आघाडीबरोबर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर नाही, असे स्पष्ट करुन मुंबई परिसरातील उत्तर भारतीय मुस्लीम मतदारांना खूष केले आहे.
