मुंबई : मुंबईतील धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्ग दक्षिण वाहिनीवरील बोगद्यामध्ये मंगळवारी किरकोळ अपघात झाला. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात भारतीय नौदलाचा एक ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले. पण वाहतूक पोलीस व किनारा मार्ग कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यानी वाहतूक सुरळीत केली.
प्राथमिक माहितीनुसार, नौदलाचे वाहन बोगद्यातून जात असताना हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले. सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे बोगद्यातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. मात्र संबंधित यंत्रणांनी त्वरित ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली. हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी सुरू आहे.
गेल्या आठवड्यातही अपघात
गेल्या आठवड्यातही धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्गावर एक अपघात झाला होता. त्यात गर्भवती महिला जखमी झाली होती. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी १८ वर्षीय चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याला याप्रकरणी नोटीस देण्यात आली होती. ३३ वर्षीय तक्रारदार महिला त्यांची मर्सिडिज मोटरगाडी घेऊ जात असताना आरोपीच्या मोटरगाडीने धडक दिली होती. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्गाच्या बोगद्यात प्रवेशद्वार क्रमांक ८ जवळ हा अपघात झाला होता. जखमी महिला व्यावसायिक आहेत.