मुंबई : गावदेवी येथील उच्चभ्रू परिसरात पदपथावर ५६ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अरविंद आत्माराम जाधव (५६) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या डोक्यात आरोपीने टणक वस्तूने प्रहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने अधिक तपास करण्यात येत आहे.
गावदेवी येथील कारमायकल रोड येथील मारबोलो कंपाऊंड जवळील पदपथावर मंगळवारी अरविंद जाधव यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी टणक वस्तूने प्रहार करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जाधव पडले होते. त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी सुरूवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अरविंद यांचा भाऊ अनिल जाधव यांच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिल हा कारमायकल रोडवरील चेअरमन बंगल्यात राहतात. ते वाद्य वाजवतात.
सीसीटीव्हीच्या मदतीने गुन्ह्यांची उकल
याप्रकरणा पदपथावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता एका तरूणाचा या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून गावदेवी येथील दर्या सागर झोपडपट्टीत राहणाऱ्या वेदप्रकाश कौशल मिश्रा (२८) याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. गावदेवी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हत्येसाठी वापरण्यात आली टणकदार वस्तू
जाधव यांच्या कपाळाच्या मध्यभागी जोदार प्रहार करण्यात आला असून त्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राची अद्याप माहिती पोलिसांना मिळालेली नाही. आम्ही आरोपीला याप्रकरणी अटक केली असून त्याने हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राबाबतच त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी सांगितले. आरोपीला मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी व मृत व्यक्तीमध्ये वाद झाला होता. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपीने जाधव यांच्या डोक्यात टणक वस्तू मारली. त्यामुळे जाधव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण डोक्यावरील गंभीर जखमेमुळे जाधव यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.