दादर व परळ रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी करणाऱ्या आरोपीला दहशवाद विरोधी पथकाने(एटीएस) झारखंडमधून ताब्यात घेतले. आरोपीविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून त्याला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.राहूल श्रीपती रवीदास(२१) असे अटक आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये २८ जूनला सायंकाळी पाचच्या सुमारास एक दूरध्वनी आला होता. आरोपीने दादर, परळ रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरल्याचे सांंगितले. या दूरध्वनीमुळे सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती रेल्वे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक यांना दिली. त्यानुसार दादर व परळ रेल्वे स्थानकात शोध मोहिम राबवण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्थानकावरील विविध ठिकाणी तपासणी केली. पण तेथे कोणतीही संशयीत वस्तू अथवा व्यक्ती सापडल्या नाहीत. अखेर दादर रेल्वे पोलिसांनी अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा >>> तब्बल १५ लाखांचा इनाम असणाऱ्या नक्षली म्होरक्याच्या मुसक्या आवळणाऱ्या ATS चे फडणवीसांकडून कौतुक, म्हणाले…

धमकी आलेल्या दूरध्वनी क्रमांकाची तपासणी केली असता तो प्रथम धारावी येथून आल्याची निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता तेथे कोणीच सापडले नाही. दूरध्वनी करणारी व्यक्ती ठिकाणे बदलत होती. आरोपी कल्याण पनवेल येथे असल्याचे आढळून आले. पण तेथेही काहीच सापडले नाही. अखेर दूरध्वनी बरेच दिवस बंद असल्याचे आढळले. याबाबत एटीएसने तपासणी केली असता १३ सप्टेंबरला दूरध्वनी करणारा संशयीत झारखंड येथील गिरिडीह येथे असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन आरोपी राहुलला ताब्यात घेण्यात आले. त्याला याप्रकरणी रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले असून शनिवारी अफवा परसवल्याप्रकरणी त्याला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात चोरी व शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी गेल्या एका वर्षापासून मुंबईत राहतो. तो तेथे मजुरी करतो. दारूच्या नशेत दूरध्वनी केल्याचा दावा त्याने केला आहे. पोलीस या दाव्याची पडताळणी करत आहेत.