मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चा भंग केल्याप्रकरणी वनविभागाने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वन विभागाच्या चौकशीला त्या गैरहजर राहिल्या. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी काही वन्यप्राण्यांचे मांस खाल्ल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावरूनच वन विभागाने स्वतःहून दखल घेत त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत छाया कदम यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातील विविध अनुभव सांगताना, एका प्रसंगी त्यांनी विविध प्राण्यांचे मांस खाल्ल्याचे सांगितले. ‘अनेक गोष्टी अनुभवण्यासाठी मी त्याची चव देखील घेतली आहे,’ असे त्या म्हणाल्या. यामध्ये हरीण, रानडुक्कर, घोरपड, साळींदार हे संरक्षित वन्यजीव खाल्ल्याचे त्यांनी सांगितले. हे प्राणी संरक्षित वन्यजीव असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चा त्यांनी भंग केला आहे. हे विधान सार्वजनिक झाल्यानंतर समाज माध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

याप्रकरणी मुंबई वनक्षेत्रपाल कार्यालयातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. व्ही. भोईर यांनी अभिनेत्री छाया कदम यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२२) कायद्याचा भंग होत असल्याने नोटीस बजावली होती. त्यांना सोमवारी सकाळी ११.३० वाजता मुंबई वन विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, निर्धारित दिवशी त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नसल्यामुळे वन विभाग या गैरहजेरीची दखल घेत पुढील कायदेशीर पावले उचलणार असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मुंबईचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू, पवन शर्मा आणि संभाजीनगर येथील डॉ. संतोष पाटील यांच्यासह अनेक वन्यप्राणीप्रेमी आणि संघटनांनी कदम यांच्याविरुद्ध कायदेशीर चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कायद्याचे उल्लंघन?

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार, कोणत्याही संरक्षित वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्यांचे मांस बाळगणे किंवा सेवन करणे हा गंभीर गुन्हा आहे. मुलाखतीत उल्लेख केलेले वन्यप्राणी हे संरक्षित प्रजातींच्या यादीत असून, त्यांचे मांस खाणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. या पार्श्वभूमीवर छाया कदम यांच्या विधानाची सत्यता तपासण्यासाठी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

छाया कदम यांची भूमिका काय

अभिनेत्री छाया कदम यांनी काही कामात व्यस्त असल्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही असे सांगून पुढल्या महिन्यात चौकशीसाठी तारीख द्यावी असे सांगितले. जर त्यांनी पुन्हा अनुपस्थिती दर्शवली, तर कायदेशीर कारवाईचा मार्ग खुला असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रियांचा कल

या प्रकरणावरून समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी हे विधान केवळ अनुभव सांगण्यापुरते मत मांडले असल्याची भावना व्यक्त केली. तथापि, हा मुद्दा गंभीर मानला जात असून चौकशी अनिवार्य ठरते.