मुंबई : अभिनेत्री पूजा बॅनर्जीची दीड कोटी रुपयांची फसवणूक करणारा निर्माता श्याम डे याला अखेर बांगूर नगर पोलिसांनी कोलकाता येथून अटक केली. ओटीटीवर १६ चित्रपट प्रदर्शित करण्याचे हक्क मिळविण्याचे आश्वासन देऊन ही फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
अभिनेत्री पूजा बॅनर्जी मालाड येथे राहते. तिने अनेक हिंदी, तमीळ आणि भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. तिचा निर्मात शाम डे (४७) याच्यासोबत आर्थिक वाद होता. जुलै महिन्यात तिने बांगूर नगर पोलीस ठाण्यात बॅनर्जीविरोधात दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. तेव्हापासून श्याम डे फरार होता. अखेर त्याला बांगूर नगर पोलिसांच्या पथकाने कोलकात्यामधून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डे याने यापूर्वी मनीष सिंघानिया याची पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात त्याच्याविरोधात कोलकाता येथील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नेमके प्रकरण काय ?
अभिनेत्री पूजा बॅनर्जीने बांगून नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये निर्माता श्याम डे याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या १६ नव्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचे हक्क मिळविण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले होते. यासाठी व्हायकॉम १८ या कंपनीसोबत व्यवहार सुरू असल्याचा दावा केला. या संदर्भात एका ई-मेलचा स्क्रीनशॉटही दाखवला. यावर विश्वास ठेवून पूजा व कुणाल यांनी ९ एप्रिल रोजी गुंतवणुकीचा करार केला. यानंतर १७ एप्रिल ते ५ मे दरम्यान दोघांनी मिळून ‘शॅडो फिल्म्स’, ‘माधव एंटरप्रायझेस’ आणि ‘अल्ट्रा ट्रॅव्हल्स’च्या खात्यांमध्ये एकूण १ कोटी ६८ लाख रुपये बॅंक खात्यात पाठवले.
काही दिवसांनी श्याम डे आजारी पडला. त्याच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचाराचा खर्चही पूजा आणि कुणाल यांनी केल्याचा दावा केला आहे. मात्र, करारानुसार परतावा मिळत नसल्यामुळे त्यांनी श्याम डे यांच्याकडे पैसे परत मागितले. श्याम डे याने जूनअखेरपर्यंत पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केवळ १० लाख रुपयेच परत केले. त्यामुळे पूजा बॅनर्जीने बांगूर नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानुसार बांगूर नगर पोलिसांनी १६ जुलै रोजी श्याम डे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
अभिनेत्री बॅनर्जीवरही गुन्हा
दुसरीकडे, श्याम डेची पत्नी मालविका डे हिने मे महिन्यात गोवा पोलिसांत पूजा आणि कुणालवर अपहरण, मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार ३१ मे रोजी गोव्यातील एका दौऱ्यावर असताना पूजा आणि तिच्या पथकाने श्याम डे याला गाडी थांबवून अज्ञात स्थळी नेले. तिथे त्याला मारहाण केली, धमकावले आणि बनावट अमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन सुमारे २३ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. यात काही रक्कम पूजाचा सहायक मुनमूनला कोलकात्यात दिल्याचे, तसेच काही रक्कम पूजा व कुणाल यांच्या खात्यांमध्ये पाठवल्याचे म्हटले आहे.
या दोघांनी डे याचा मोबाइल घेऊन वैयक्तिक माहिती आणि पासवर्ड मिळवले. जबरदस्तीने चित्रफित तयार करून ‘ऍंबर व्हिला’ रिसॉर्टमध्ये आपण स्वेच्छेने राहत असल्याचे कबूल करायला लावले, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी पूजा बॅनर्जी व कुणाल वर्मा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनस) अंतर्गत कलम १२६ (२) (अनधिकृत अडवणूक), १३७ (२) (अपहरण), १४० (२) (खंडणीसाठी अपहरण), ३०८ (२) (खंडणी), ११५ (२) (हानी पोहोचवणे), ३५१ (३) (धमकी), ६१ (२) (कट रचणे) आणि ३ (५) (समान हेत) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.