मुंबई : साठ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी तपास यंत्रणेने काढलेली दिसता क्षणी ताब्यात घेण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्याच्या आणि परदेश प्रवासासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. तथापि, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पती राज कुंद्राविरुद्ध साक्षीदार होण्याचा विचार का करत नाही, अशी विचारणा न्यायालयाने शिल्पा हिला केली.

येत्या २२ ते २७ दरम्यान व्यवसायासाठी शिल्पासह तिचा मुलगाच परदेशात जाणार असल्याची माहिती शिल्पा शेट्टीच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. तसेच, तिचे पती, व्यापारी राज कुंद्रा, त्यांची मुलगी आणि आईसह मुंबईतच राहणार असल्याचेही न्यायालयाला सांगितले. शिल्पा व्यावसायिक कारणांसाठी परदेशी जाणार असल्याचे सांगून त्याचा तपशीलही न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उपरोक्त टिप्पणी केली. तसेच, शिल्पाच्या परदेश दौऱ्याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांवर ६० कोटी रुपयांचे कर्ज आणि फसवणुकीचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना कुटुंबासमवेत परदेशात जाण्याची परवानगी देता येणार नाही, न्यायालयाने मागील सुनावणीवेळी सुनावले होते.

त्यानुसार, मंगळवारी मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शिल्पा शेट्टीला व्यावसायिक कामासाठी जाऊन दिल्यास करारानुसार, त्यांना अनामत रक्कम परत कारवी लागेल. दुसरीकडे तक्रार कुंद्राविरुद्ध असून शेट्टी यांच्याविरुद्ध कोणतेही विशिष्ट आरोप नाहीत. त्यामुळे शेट्टी आणि तिचा मुलगाच परदेशात जाणार असल्याचे तिच्यावतीने सांगण्यात आले. त्यांच्या दाव्याला तक्रारदाराकडून विरोध करण्यात आला. आपल्या सोयीनुसार, आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर कौटुंबिक सहलीचे व्यावसायिक भेटीत रुपांतर झाल्याचा दावाही केला. त्याची दखल घेऊन सरकारी वकिलांना सूचना घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.