एका व्यावसायिकाच्या ६० कोटी रुपयांच्या झालेल्या फसवणुकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे साडेचार तास चौकशी केली. या प्रकरणात मी लाभार्थी नसल्याचा दावा शिल्पाने केला. विशेष म्हणजे ही चौकशी शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी करण्यात आली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि सिने निर्माता राज कुंद्रा याच्यावर व्यावसायिक दिपक कोठारी याची ६० कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. राज कुंद्राने या ६० कोटींपैकी १५ कोटी रुपयांची रक्कम आपल्या पत्नी व अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कंपनीच्या बँक खात्यात वळविल्याची माहिती समोर आली होती. ४ ऑक्टोबर रोजी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन तिची चौकशी करण्यात आली. त्या वेळी राज कुंद्राही घरात उपस्थित होता.

चौकशीत काय?

चौकशीदरम्यान शिल्पाला तिच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यात राज कुंद्राने पाठविलेल्या १५ कोटी रुपयांच्या व्यवहारासह फसवणुकीशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र शिल्पाने आपल्या कंपनीच्या खात्यात कोणतेही पैसे वळविण्यात (ट्रान्सफर) झाले नसल्याचा दावा केला आहे. तिने चौकशीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेला काही दस्तऐवजही दिले असून, त्यांची पडताळणी सुरू आहे.

राज कुंद्राची दुसर्यांदा चौकशी

राज कुंद्रा याला पुन्हा चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले होते. मात्र त्यांच्या विनंतीवरून त्याच दिवशी त्यांचीही सुमारे ४ तास चौकशी करण्यात आली. राज कुंद्रा याने या प्रकरणात काही कागदपत्रे सादर केली होती. त्यांची पडताळणी करून नव्या पुराव्यांच्या आधारे त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

५ जणांचे जबाब

या प्रकरणात तक्रारदार दीपक कोठारी यांच्या मुलाचा जवाब देखील नोंदवण्यात आला आहे. कोठारी यांचा मुलगा बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक होता. आतापर्यंत या प्रकरणात शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, रिझोल्यूशन प्रोफेशनल राजेंद्र भुट्टा यांच्यासह एकूण ५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. लवकरच बेस्ट डील टीव्ही मध्ये काम करणाऱ्या आणखी ४ ते ५ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

प्रकरण काय?

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे संचालक होते. फिर्यादी व्यवसायिक दीपक कोठारी यांनी २०१५ ते २०२३ दरम्यान या कंपनीत ६० कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीतील ८७.६% शेअर्स या दोघांच्या नावावर होते, दीपक कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये त्यांनी ‘शेअर सबस्क्रिप्शन अॅग्रीमेंट’ अंतर्गत कंपनीत ३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये सप्लिमेंटरी अॅग्रीमेंट अंतर्गत आणखी २८.५३ कोटी रुपये वळवले (ट्रान्सफर) केले. मात्र शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चांसाठी वापरली असा आरोप कोठारी यांनी तक्रारीत केला आहे.