Aaditya Thackeray On Adani Group : गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या राज्याला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. अशात सध्या न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या रखडलेल्या खटल्यामुळे या निवडणुका कधी होणार याबाबत निश्चितता नाही. असे असले तरी राज्यातील सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

दरम्यान आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाने मुंबईत केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह अदाणी समूहावरही जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे, असा आरोप केला आहे.

अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे

यावेळी बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईत होत असलेल्या प्रदूषणावर कोणतेही काम दिसत नाही. राज्य सरकारकडून उपाय-योजना सोडा, नागरिक आणि मुंबईकरांना उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाही. हे असे हाल सर्वत्र आहेत. तसेच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवली आहे. हे सगळं होत असताना, ईस्ट इंडिया कंपनी ७५-१०० वर्षांपूर्वी होती. पण आता अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे, याच अदाणी समूहाला भाजपा सरकार जेवढ्या काही सवलती आहेत, त्या सर्व देत आहे. आता केंद्राचा अर्थसंकल्प येत आहे. आम्हाला कळाले आहे की, मुंबईवर आता वेगळा कर येणार आहे. तो म्हणजे अदाणी कर. आपण कर भरतो आणि त्याचा फायदा अदाणींना होत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा सरकार म्हणजेच अदाणी समूहाचे सरकार

पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरूनही भाजपा सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “आता अदाणी सरकार आले आहे, अदाणी समूहाचे सरकार आले आहे. भाजपा सरकार म्हणजेच अदाणी समूहाचे सरकार. यापूर्वी भाजपाचे असो की शिंदेंचे आमदार असो ते मदर डेअरीच्या प्लॉटवर गार्डन बनवू असे खोटे बोलत होते. आता परवाच बातमी आली आहे की, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट बाजार भावापेक्षा १० टक्के कमी दराने दिला जात आहे.”