मुंबई : ‘कुछ खास है हम सभी में’, ‘ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं’ अशा बहुढंगी घोषवाक्यांसह कॅडबरी, फेविकॉल आदी नामांकित कंपन्यांच्या लोकप्रिय जाहिरातींचे जनक पियूष पांडे यांचे शुक्रवारी पहाटे ५.५० वाजता एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

पांडे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय जाहिरात विश्वाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पियूष पांडे यांच्या निधनाने अत्यंत सर्जक व्यक्तिमत्त्व आणि गेली चार दशकांहून अधिक काळ जाहिरात उद्योगातील घडामोडींचा साक्षीदार असलेले अतुलनीय पर्व लयाला गेल्याची भावना व्यक्त होते आहे.

भारतीय जाहिरात उद्योगाचे पितामह म्हणून ओळखले गेलेले पियूष पांडे आजही सल्लागार या नात्याने ओगल्वी या नामांकित जाहिरात कंपनीशी जोडलेले होते. गेले काही दिवस त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी नीता पांडे, भाऊ प्रसून पांडे, बहीण इला अरुण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन, गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, अभिनेत्री रवीना टंडन आणि जाहिरात-उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पियूष पांडे यांना श्रध्दांजली वाहिली.

मूळचे जयपूरचे असलेले पियूष पांडे जाहिरात विश्वात प्रवेश करण्यापूर्वी क्रिकेटपटू होते. त्यांनी त्याआधीही अनेक छोटी-मोठी कामे केली. त्यानंतर १९८२ साली ते त्यावेळी ओगल्वी अँड मेथर या नावाने कार्यरत असलेल्या ब्रिटिश जाहिरात कंपनीत रुजू झाले होते. याच जाहिरात कंपनीत एका सामान्य पदावर कामाला सुरुवात केलेल्या पियूष पांडे यांनी त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर लवकरच जाहिरात निर्मितीच्या सर्जक क्षेत्रात प्रवेश केला.

अनेक नामांकित कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांना जाहिरातीच्या माध्यमातून चेहरा मिळवून देणाऱ्या पियूष पांडे पुढे ‘ओगल्वी इंडिया’ या कंपनीत सर्वोच्च पदावर पोहोचले. ते २०२३ मध्ये ओगल्वी इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष या पदावरून निवृत्त झाले आणि सल्लागार या नात्याने काम पाहात होते. त्यांनी जाहिरात क्षेत्रात कामाला सुरूवात केली तेव्हा ओगल्वी कंपनीचा चेहरामोहरा ब्रिटिश असल्याने इंग्रजाळलेले वातावरण आणि कामाची पध्दत रुढ होती.

पियूष पांडे यांनी पहिल्यांदा जाहिरातीचे लेखन आणि निर्मिती करताना हिंदीवर भर दिला. दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी आणि रोजच्या जगण्यातील विसंगतीचा पुरेपूर वापर करत त्यांनी केलेल्या जाहिरातींना प्रेक्षकपसंती मिळाली. दूरचित्रवाहिनी माध्यमाचा प्रभाव हळूहळू वाढत असतानाच्या काळात गंमतीशीर कल्पनांवर आधारित फेव्हिकॉलच्या त्यांनी केलेल्या जाहिरातींची मालिका, कॅडबरीची जाहिरात, ‘हर खुशीं मे रंग लाए’ म्हणत केलेली एशियन पेंट्सची जाहिरात अशा जाहिराती खूप गाजल्या.

सुरूवातीला कार्यक्रमांच्या मध्ये मध्ये येणाऱ्या नीरस जाहिराती म्हणजे वैताग असा दृष्टिकोन असलेले प्रेक्षक या जाहिराती आवडीने पाहू लागले. त्यांच्या जाहिरातींनी आपला एक स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला आणि जाहिरातविश्वाचे एकूणच अर्थकारण बदलण्यातही त्यांचा मोठा हातभार लागला.

‘मिले सूर मेरा तुम्हारा…’ हे गाणेही त्यांच्याच लेखणीतून उतरले होते. त्यांनी २०१४ मध्ये ‘अब की बार मोदी सरकार’ हे नवीन घोषवाक्य देत केलेले भारतीय जनता पक्षाचे कॅम्पेनिंगही तितकेच लोकप्रिय ठरले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पियूष पांडे यांचे क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम होते. आपण जे काही शिकलो ते क्रिकेटच्या खेळातून शिकलो, असे ते म्हणत असत.

क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आजचा सर्वाधिक लोकप्रिय आयपीएल क्रिकेटची संकल्पनाही पियूष पांडे यांचीच होती. जाहिरात क्षेत्रात अतुलनीय यश मिळवणाऱ्या पियूष पांडे यांनी त्यांच्या आजवरच्या यशाचे श्रेय नेहमी टीमवर्कला दिले. हे माझे एकट्याचे यश नाही, असे ते म्हणत असत. तंत्रज्ञानाच्या वेगात वाहवत जाताना तुमचे मूळ हरवता कामा नये, म्हणणाऱ्या आणि भारतीय जाहिरात उद्योगाला वैश्विक ओळख मिळवून देणाऱ्या पियूष पांडे यांच्यासारखा जाहिरातप्रभू पुन्हा होणे नाही.