मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘इन्फोसिस’ कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची माहिती दिली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, इन्फोसिसचे तिरूमला आरोही, संतोष अंनदापुर, किरण एम. जी. आदी अधिकारी उपस्थित होते.

इन्फोसिस पहिल्यांदाच असा करार करत आहे. यामुळे जवळपास ४० लाख विद्यार्थी आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना फायदा होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही, अशी माहिती सामंत यांनी दिली.

इन्फोसिसच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे ३,९०० हून अधिक ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले असून ते कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड या ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासोबत उपलब्ध असतील. पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

यामध्ये संगणकाच्या प्रोग्रािमग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांसोबतच बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम असतील आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

या सामजंस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत १,६०० महाविद्यालयातील १० लाख विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत तीन हजार महाविद्यालयातील ३० लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यांना इन्फोसिस स्प्रिंगबोर्डचे ३,९००हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध होतील आणि सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल. इन्फोसिसच्या म्हैसूर येथील इन्स्टिटय़ुटमध्ये संबंधित प्राध्यापक, अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

उपक्रमाची वैशिष्टय़े

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मंचावरील कृती प्रवण अध्ययनामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी मदत होईल. तसेच, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगारविषयक कौशल्ये प्राप्त होतील. शिक्षकांनाही सर्व अभ्यासक्रम वापरता येतील. याद्वारे ऑनलाईन परिक्षा घेण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. रत्नागिरीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नागपूरची शासकीय विज्ञान संस्था यांसाठी खास तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वरील सर्व सुविधासोबतच प्रोजेक्ट इंटनशिप आणि एलएमएसची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.