मुंबई :स्पर्धेच्या शर्यतीत धावणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाढत्या ताण-तणावाचा परिणाम मानसिक आरोग्यावर गंभीर स्वरूपात दिसू लागला आहे. आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत असताना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) दिल्लीने विद्यार्थ्यांसाठी ‘नेव्हर अलोन’ हा नावीन्यपूर्ण मानसिक आरोग्य व वेलनेस कार्यक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना चोवीस तास मदत, मानसिक आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग), समुपदेशन, तातडीचे हस्तक्षेप आणि त्यानंतरचे फॉलो-अप अशा सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम सुरक्षित वेब-आधारित ॲप्लिकेशन आणि वॉटस्ॲपवर इंटिग्रेशनच्या माध्यमातून राबवला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मदतीसाठी सहज संपर्क साधता येणार आहे.

या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना एकाकीपणाच्या भावनेतून बाहेर काढणे, वेळेवर मानसिक आधार देणे आणि आत्महत्येचे प्रमाण रोखणे हा आहे. “विद्यार्थ्यांना आपण एकटे नाही, कोणीतरी सतत सोबत आहे, हा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे एम्सच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी या पावलाचे स्वागत केले असून, देशातील इतर उच्च शिक्षण संस्थांनीही अशा प्रकारचे तातडीचे उपाय स्वीकारावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशभरात वाढत्या स्पर्धेच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ढासळत चालले आहे. शिक्षणातील तीव्र ताणतणाव, अपार अपेक्षा आणि अपुरी मानसिक आरोग्य सेवा या साऱ्यांचा परिणाम म्हणून आत्महत्यांच्या घटना चिंताजनक पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यातही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची वाढ समाजाला धक्का देणारी ठरत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०२२ मध्ये देशभर घडलेल्या आत्महत्यांपैकी तब्बल ७.६ टक्के आत्महत्या विद्यार्थ्यांनी केल्या. २०१३ मध्ये हा आकडा ६,६५४ इतका होता तो वाढून २०२२ मध्ये तो दुप्पट होऊन १३,०४४ वर पोहोचला आहे. म्हणजे गेल्या दशकात विद्यार्थी आत्महत्या तब्बल ८० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

यापैकी वैद्यकीय क्षेत्राची परिस्थिती अधिक गंभीर आहे. नॅशनल मेडिकल कमिशनच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत १२२ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात ६४ जण एमबीबीएस तर ५८ जण पदव्युत्तर शिक्षण घेत होते. त्याहून धक्कादायक म्हणजे पदव्युत्तर विद्यार्थ्यांपैकी २८ टक्के विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा विचार कधी ना कधी मनात आणल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. चार टक्क्यांहून अधिकांनी प्रत्यक्ष प्रयत्नही केला आहे.

तणावाची कारणे कोणती?

शिक्षणातली अवास्तव स्पर्धा, प्रवेश परीक्षेतील दडपण, आर्थिक ओझं, रगिंग आणि उपेक्षात्मक वर्तन, अखंड अभ्यासाचे तास आणि अपुरी मानसिक आरोग्य सुविधा या घटकांमुळे विद्यार्थी दबावाखाली येत आहेत. अनेकदा मदतीसाठी हात पुढे करण्यास सामाजिक कलंक अडथळा ठरतो. त्यामुळे मानसिक त्रास होत असतानाही विद्यार्थी गप्प राहतात आणि परिस्थिती टोकाला गेल्यावरच समाजाला हादरवून टाकणाऱ्या घटना घडतात. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात आता प्रभावी समुपदेशन केंद्रे व हेल्पलाइनची सोय असणे आवश्यक आहे तसेच अभ्यासक्रमाचा ताण कमी करण्यासाठी संरचनात्मक बदल गरजेचे आहेत.

पालक व शिक्षकांनीही अपेक्षांचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक असल्याचे केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) दिल्लीने विद्यार्थ्यांसाठी ‘नेव्हर अलोन’ हा सुुर केलेला नावीन्यपूर्ण मानसिक आरोग्य व वेलनेस कार्यक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वासही डॉ सुपे यांनी व्यक्त केला.