मुंबई : हवामानासह प्रदूषणाची इत्यंभूत माहिती देणारे बेलापूर जंक्शनजवळील हवा गुणवत्ता निर्देशांक डिजिटल डिस्प्ले बोर्ड गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना हवामानासह हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, हा फलक लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

मागील काही महिने मुंबईबरोबरच नवी मुंबई परिसरातही हवा गुणवत्ता खालावली होती. राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबई शहराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे तेथील विकासही झपाट्याने होत असून महा मुंबई उदयास येत आहे. असे असले तरी दुसरीकडे याच राहण्याजोगे प्राधान्य देणाऱ्या शहरात दिवसेंदिवस अतिखराब, अशुद्ध हवा नागरिकांना मिळते. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत येथील हवेचा दर्जाही खालावला होता. दरम्यान, हवेत सुधारणा झाली असली तरी त्याबाबतची अद्ययावत माहिती देणारे बेलापूर जंक्शनजवळील फलकांत मागील अनेक दिवसांपासून बिघाड झालेला आहे. यामुळे तेथील नागरिकांना हवेचा दर्जा तसेच हवामान स्थिती कळण्यास अडचण निर्माण होत आहे.

फलक लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, २०२२ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला असला तरी राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निर्देशांक मूल्यातून नवी मुंबईची हवा ही अति खराब असल्याचे जाहीर करण्यात आले होते. नवी मुंबई शहरात एमआयडीसी लगत असलेल्या विभागांमध्ये रात्रीच्या वेळी उग्र वास येण्याचे प्रकार वाढत आहेत. थंडीच्या दिवसांत तर वासाचे प्रमाण अधिक वाढते. त्याचबरोबर नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळेही हवेत धुळीचे प्रमाण वाढलेले असते.

नवी मुंबई शहरात औद्योगिक कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक मिश्रित प्रदूषित हवा अशीच हेवेत सोडली जाते. थंडीच्या दिवसांमध्ये हे प्रमाण अधिक असते. नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू असल्याने ही त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या धुरळ्यामुळेही हवेत धुलीकण मिसळत आहेत, असा दावा केला जात आहे.

गेल्या काही वर्षांत प्रदूषणात वाढ

गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस हवा प्रदूषण वाढत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्या रासायनिक मिश्रित हवेवर कोणतीही प्रक्रिया न करता प्रदूषक घटक हा हवेत तसेच सोडून दिली जातात. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे.

नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक

शुक्रवार एकूण निर्देशांक- ८२

वाशी- ७४ (समाधानकारक)

महापे- ९४ (समाधानकारक)

सानपाडा – १०१ (मध्यम)

कळंबोली – ६१ (समाधानकारक)

तळोजा – ८२ (समाधानकारक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेले अनेक दिवसांपासून बेलापूर येथील हवा गुणवत्ता निर्देशांक डिस्प्ले बोर्ड बंद आहे. यामुळे नागरिकांना हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यास अडचण होत आहे. हवेची गुणवत्ता, हवामान याबाबत माहिती मिळणे सद्यस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. यामुळे बंद पडलेला डिस्प्ले बोर्ड लवकरात लवकर दुरुस्त करावा.- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन