मुंबई : कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांत मुंबईतील माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. विशेषतः रुईया नाट्यवलयने मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार व तंत्रज्ञ दिलेले आहेत. बहुप्रतीक्षित ‘सुशीला-सुजीत’ या मराठी चित्रपटाचे पटकथा व संवाद लेखन रुईया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अजय कांबळे याने केले आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात रुईया महाविद्यालयातूनच सोमवारी झाली. यावेळी रंगलेल्या विशेष कार्यक्रमाचे अजयने सूत्रसंचालन करून आठवणींना उजाळा दिला. यावेळी रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात अजयचे कौतुकही केले.

‘सुशीला-सुजीत’ हा मराठी चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात सोमवार, ३ मार्च रोजी माटुंग्यातील रुईया महाविद्यालयातून झाली. यावेळी चित्रपटाच्या ‘चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, अंगाशी आलया’ या प्रसारगीताचे लॉन्चिंग करण्यात आले. या गाण्यावर गश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर यांनी नृत्य सादर करीत विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली. या शानदार सोहळ्यात चित्रपटाचे निर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, प्रसाद ओक, निलेश राठी, संगीत दिग्दर्शक वरूण लिखते, गायक प्रवीण कुंवर आणि कविता राम, गीतकार मंदार चोळकर, नृत्यदिग्दर्शक मेहुल गदानी आणि इतर कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडीओजचे असून कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे.

‘मी रुईया महाविद्यालयाशी २००९ पासून जोडलो गेलो आहे. रुईया महाविद्यालयात असताना पाच वर्षात विविध एकांकिकांमधून अभिनेता आणि त्यानंतर दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. रुईया नाट्यवलयमुळे माझी एकूणच जडणघडण झाली. एक लेखक म्हणून आयुष्यातील पहिल्यावहिल्या ‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरूवात रुईया महाविद्यालयाच्या मंचावरून होत आहे, ही माझ्यासाठी भावनिक आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा माझ्यासाठी खूप खास क्षण होता’, अशी भावना अजय कांबळे याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटाच्या नावामध्येच वेगळेपण असल्यामुळे आपसूकच उत्सुकता निर्माण होते. एक उत्तम गोष्ट असणाऱ्या या चित्रपटात प्रासंगिक विनोद आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आले असून नात्यातील गुंतागुंत व समस्या सोडविणारा हा चित्रपट ठरेल. यामध्ये कुठेही अश्लील विनोद नसून सहकुटुंब पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. रसिकप्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल, हा आम्हाला विश्वास आहे’, असेही अजय कांबळे म्हणाला. तर प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला की, ‘आजवर रुईया महाविद्यालयाने विविध भाषेतील मनोरंजनसृष्टीला हजारो कलाकार व तंत्रज्ञ दिले आहेत. आमची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटाचा लेखकही रुईयाचा माजी विद्यार्थी आहे. त्यामुळे प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात रुईयातून होणे हा आमच्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. तसेच मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा’.

दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या आठवणींना उजाळा. . .

मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी मोहोर उमटवणाऱ्या दिग्दर्शकांच्या मांदियाळीत दिवंगत दिग्दर्शक व अभिनेते निशिकांत कामत यांचे नाव आवर्जून घेतले जाते. मराठीतील ‘डोंबिवली फास्ट’ असो किंवा ‘लय भारी’, तसेच हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ असो किंवा ‘दृश्यम’ आदी वैविध्यपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटांनी तिकीट खिडकीवर दमदार कामगिरी करीत आर्थिक यशही साधले. निशिकांत कामत हे रुईया महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यामुळे ‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुईया महाविद्यालयात आल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी कामत यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘निशिकांत कामत यांच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मी व मंजिरी कॅमेऱ्याला सामोरे जायला शिकलो. त्याच्यामुळे आमची कॅमेऱ्याशी ओळख झाली. त्यामुळे आमची पहिली निर्मिती असलेल्या ‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरूवात आमच्या ‘निशी’च्या रुईया महाविद्यालयातून होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक व अभिमानाची गोष्ट आहे, आज ‘निशी’ला प्रचंड आनंद झाला असता’, अशी भावना प्रसाद ओक यांनी व्यक्त केली. तर सध्याची युवा पिढी ही मराठी चित्रपट पाहत नाही, असे नेहमी बोलले जाते. त्यामुळे मराठी चित्रपट त्यांच्यापर्यंत पोहोचावा, त्यांना समजावा यासाठी मुद्दाम ‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरूवात महाविद्यालयातून केली आहे, असेही प्रसाद ओक यांनी सांगितले.