मुंबई : अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या बेकायदा भोंग्यासंदर्भात मुंबईतील मशिदींची तपासणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कायदा हातात घेता कामा नये. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांची यासंदर्भात भेट घेत आपल्या तक्रारी सांगितल्या. बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषद आमदार इद्रीस नायकवडी, आमदार सना मलिक, माजी आमदार झिशान सिद्दीकी, सपा आमदार अबु आझमी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी, ‘एमआयएम’चे नेते वारीस पठाण आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

देशात नमाजसाठी भोंग्याचा कुणालाही त्रास नाही. मुंबईत भाजपचे किरीट सोमय्या यांनी हा विषय वाढवला आहे. मशिदींवरच्या भोंग्याची तपासणी करण्यासाठी परवानग्या घेतल्या का, मशिद कायदेशीर आहे का, बांधकामांना परवानगी घेतली का, याविषयी तपासणी करण्यात येत आहे. यामुळे मशिदींचे विश्वस्त त्रासले आहेत. मुस्लिमांविषयी व्देष निर्माण करण्यासाठीचे हे भाजपचे कारस्थान आहे, असा आरोप आमदार अबु आझमी यांनी केला.

भोंग्यांनी नियमांचा भंग केल्यास आवाजाची मर्यादा ओलांडल्यास जरुर कारवाई करा. पण सगळे काही सुरळीत चालू असताना मशिदींची तपासणी कशासाठी कशासाठी करता ? किरीट सोमय्या हे पोलिसांना बरोबर घेवून मशिदींची तपासणी करु नये. सोमय्या यांना तपासणीसाठी मशिदीत जाण्यापासून रोखण्यात यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस ठाण्यांना अशा सूचना द्या. विनाकारण अल्पसंख्यांक समाजाला त्रास होता कामा नये, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना दिल्याचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी सांगितले. विधिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक समाजाचे सर्वाधिक सदस्य आहेत. अल्पसंख्याक समाज अजित पवार यांना आपला नेता मानतो. त्यामुळे दादांनी आजची बैठक घेवून याप्रश्नी तोडगा काढल्याचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी सांगितले.