मुंबई : समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, अशा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या दाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केले होते. राजमाता जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरु व मार्गदर्शक होत्या, या शरद पवार यांच्या भूमिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समर्थन केले असून राजमाता जिजाऊ यांनीच शिवाजी महाराजांना घडविले, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या रिंगणात; किरण सामंतांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांना स्वराज्य निर्माण करता आले होते, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी नुकताच आळंदी येथे अलिकडेच गीता-भक्ती अमृतमोहत्सव सोहळय़ात केला होता. शरद पवार यांनी त्याचे तातडीने खंडन करीत राजमाता जिजाऊच महाराजांच्या मार्गदर्शक होत्या आणि काही लोक वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करीत असले तरी तो जगाला माहीत आहे, असे नमूद केले होते. अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या ‘ स्वराज्य सप्ताह ’ कार्यक्रमात शरद पवार यांच्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थन केले. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरू आणि मार्गदर्शक होत्या. त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली आणि याच प्रेरणेतून अठरा पगड जातीच्या मावळय़ांच्या साथीने हिंदूवी स्वराज्य स्थापन केले, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> शालेय पोषण आहार आता होणार अधिक पोषक; विद्यार्थ्यांना काय मिळणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कायमच शिवाजी महाराजांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेतून प्रेरणा घेतली आहे, असे सांगून अजित पवार यांनी बहुजनवादी विचारधारेबरोबर कायम असल्याचे संकेत दिले.अजित पवार हे भाजप प्रणित राज्य सरकारमध्ये सामील झाले असले तरी भाजपच्या विचारधारेतील प्रत्येक मुद्दय़ाशी सहमत नसल्याचे या निमित्ताने पवार यांनी दर्शविले आहे.  शिवाजी महाराजांचे राज्य हे ‘भोसल्यांचे राज्य ’म्हणून ओळखले जात नाही. ते आजही ‘ रयतेचे राज्य ’ म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूवी स्वराज्याची स्थापना केली. दुर्गम डोंगरकपारीतील अठरापगड जातींना बरोबर घेऊन त्यांनी ‘रयतेचे राज्य ’ निर्माण केले. आपल्यालाही त्याच मार्गावरुन वाटचाल करायची आहे. महाराज रयतेचे राजे होते. लोकल्याणकारी राजे होते, असे अजित पवार यांनी नमूद केले.