राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सिंचन मंत्री सुनील तटकरे यांची कथित घोटाळ्याबाबत सुरू असलेली चौकशी वेगात सुरू असल्याचे स्पष्टीकरण लाचलुचपचत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी करून केले आहे. विशेष म्हणजे अशा रीतीने राजकीय नेत्यांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीबाबत प्रसिद्धी पत्रक काढून माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चौकशींबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानेच हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी करणाऱ्या विशेष पथकाने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पत्र मिळाल्यानंतर भुजबळ  चौकशीसाठी हजर झाले होते. तब्बल दोन-तीन वेळा एसीबी कार्यालयात येऊन भुजबळांनी आपला जबाब नोंदविला होता. याबाबत महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले की, काही मुद्दय़ांबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी भुजबळ स्वत: आले होते.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाणे एसीबीकडून चौकशी सुरू असून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवूनही ते हजर झाले नाहीत. उलटपक्षी त्यांनी वेळ मागून घेतला. मात्र एसीबीने या दोन्ही माजी मंत्र्यांना प्रश्नावली पाठवून त्यांचे स्पष्टीकरण मागविल्यामुळे या दोन्ही माजी मंत्र्यांना चौकशीसाठी जातीने हजर राहण्यापासून सवलत दिल्याबाबत जोरदार टीका झाली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक दत्ता कराळे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून या चौकशीची माहिती दिली आहे.  या पत्रकात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पातील अनियमिततेबाबत उघड चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत प्रकल्पाशी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि सर्वाची सखोल चौकशी सुरू आहे.

कोणालाही पाठिशी घालणार नाही – फडणवीस
महाराष्ट्र सदन प्रकरण असो वा सिंचन घोटाळा असो. या घोटाळ्याची चौकशी निष्पक्षपातीपणे होईल. कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वार्ताहरांशी बोलताना केले. या घोटाळ्यांची चौकशी सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.