शैलजा तिवले

मोठय़ा करोना आरोग्य केंद्रातील अतिदक्षता विभाग बाह्य़सेवा तत्त्वावर दिल्यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील रुग्णांकरिता सोयीच्या ठरणाऱ्या मुलुंड आणि दहिसर आरोग्य केंद्रातील सर्व खाटा संस्थेला चालविण्यास देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, यासाठी निविदादेखील काढल्या आहेत.

मनुष्यबळ अपुरे असल्याने पालिकेने वांद्रे कुर्ला संकुलासह, मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी, गोरेगाव येथील मोठय़ा आरोग्य केंद्रातील ६१२ अतिदक्षता विभागाच्या खाटा तीन संस्थांना चालविण्यास दिल्या आहेत. या पाठोपाठ आता मुलुंड आणि दहिसर आरोग्य केंद्रांतील सर्व खाटा बाह्य़सेवा तत्त्वावर चालविण्यासाठी संस्थेची निवड करण्यात येणार आहे.

दहिसर आणि मुलुंड आरोग्य केंद्रात प्रत्येकी ऑक्सिजनच्या ५०० आणि बिगर ऑक्सिजनच्या ५०० अशा एकत्रित दोन हजार खाटा आहेत. त्याचे संपूर्ण व्यवस्थापन संस्थेने करणे अपेक्षित आहे. यासाठी खाटेमागे पैसे देण्यात येतील. सुरुवातीला यात बीकेसी आणि नेस्को (गोरेगाव) केंद्राचा समावेश होता. मात्र नंतर ही केंद्र यातून वगळल्याचे समजते.

केंद्रात ५० खाटांचा एक विभाग असेल. याकरिता डॉक्टर, परिचारिका, कन्सल्टंट यासह ७० जणांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यांच्या जेवण, राहण्याची सुविधा पालिका करेल. पायाभूत सुविधा, औषधे, उपकरणे, सामुग्री, रुग्णवाहिका याचा पुरवठा पालिकमार्फत केला जाईल. तसेच केंद्रातील शवागराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पालिकेची असेल.

सहा महिन्यांसाठी किंवा करोना उद्रेक संपेपर्यंत संस्थांसोबत करार असेल. कमीत कमी २५ टक्के खाटांची रक्कम हमी म्हणून संस्थेला दिली जाईल असे निविदेत स्पष्ट केले आहे.

खर्चाचा भार कमी करण्यासाठी.. : मुलुंड आणि दहिसर केंद्रामध्ये बहुतांश रुग्ण हे नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार भागांतील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा आर्थिक भार पालिकेवर पडू नये. संभाव्य दुसऱ्या करोना लाटेमध्ये आवश्यकता भासल्यास ही केंद्र थेट त्यांच्याकडे सोपवून खर्च भागविण्यास सांगता येऊ शकेल, या दृष्टीने ही तयारी केली जात असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.