मुंबईत करोनाची मगरमिठी पुन्हा आवळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत. एकिकडे निर्बंध लागू केलेले असताना महापालिकेकडून चाचण्यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिकेनं आता गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे. मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी ग्राहकांच्या अँटिजेन चाचण्या केल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून सर्व मॉल्ससाठी स्वॅब संकलन केंद्र सक्तीचे करण्यात आलं आहे. यासाठी मॉलच्या प्रवेशद्वारावरच पथक नियुक्त केलं जाणार असून, याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल असं,” अशी माहिती काकाणी यांनी दिली.

लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधणं खूप अवघड काम आहे. अशी व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं असणार आहे,” असं काकाणी यांनी सांगितलं.

करोनाबाधितांमध्ये नवी लक्षणे

शहरात आढळणाऱ्या बहुतांश करोनाबाधित रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे फुप्फुसांशी निगडित न आढळता अतिसार, जुलाब असे पोटाचे विकार, डोकेदुखी इत्यादी लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत. त्यामुळे कोणत्याही अन्य कारणांशिवाय अशी लक्षणे आढळल्यास तातडीने करोनाच्या चाचण्या करण्याचे तज्ज्ञांनी सूचित केले आहे. ‘बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित आहेत. परंतु ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येतात, त्यात अनेकांना सुरुवातीला अतिसार, जुलाब असे पोटाचे विकार होतात आणि त्यानंतर त्यांना ताप येतो. यापूर्वी रुग्णांमध्ये सर्दी आणि ताप हीच लक्षणे प्रामुख्याने दिसत होती’, असे फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All malls in mumbai to have rapid antigen test facility to check covid infection bmh
First published on: 19-03-2021 at 11:49 IST