खंडाळा घाटात नागनाथ जवळच अप रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. ही घटना पाहणाऱ्या पेट्रोलमनने त्वरीत येणारे एक इंजिन लाल सिग्नल दाखवून थांबवले. पेट्रोलमनने दाखविलेल्या सतर्कतेमुळे घाटात मोठी दुर्घटना टळली.

मुंबई-पुणे मार्गावर मोठी दरड घाट क्षेत्रात नागनाथ-पळसदरी दरम्यान अप रेल्वे मार्गावर गुरुवारी मध्यरात्री १२.५० वाजता घडली. बोगद्याजवळच घडलेल्या घटनेमुळे मुंबई पुणे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या मार्गावर अप, डाउन आणि मधली (मिडल) मार्गिका उपलब्ध आहे. तीन मार्गिकांपैकी डाउन आणि मिडल मार्गावरून गाड्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, या घटनेच्यावेळी मोतीराम लोभी या पेट्रोलमनकडून गस्त घालण्यात येत होती. ही घटना पाहताच मोतीराम याने अप मार्गावरून येणारे एक इंजिन त्वरित लाल सिग्नल दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. सिग्नल पाहताच इंजिनच्या लोको पायलटने इंजिन थांबविले. त्यामुळे पुढील अपघात टळला.

त्यानंतर दरड कोसळल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी दरड बाजूला करण्याचे काम सुरू केले. या घटनेत रुळांचे आणि ओव्हरहेड वायरचे नुकसान झाले. या मार्गावरील सेवा पूर्ववत करण्यासाठी १०० कर्मचारी कार्यरत राहिले. दरड एवढी मोठी होती की काम पूर्ण करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शुक्रवार सकाळचे सव्वा आठ वाजले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काम पूर्ण होईपर्यंत अप मार्गावरील वाहतूक उपलब्ध असलेल्या मिडल मार्गावरून काही प्रमाणात सुरू ठेवण्यात आली होती. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस, हुस्सेनसागर एक्स्प्रेस, गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस, चालुक्य एक्स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस यासह काही एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावल्या.