मुंबईः उच्च न्यायालयात बंदोबस्ताला तैनात असणाऱ्या महिला पोलिसाच्या हाताचा महिला आरोपीने चावा घेतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार निकीता कदम(२३) या उच्च न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात होत्या. त्यावेळी आरोपी महिला अफसाना अब्बास अली खातून अन्सारी(३६) ही आरडाओरडा करत होती. तिला कदम यांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता तिने कदम यांच्या डाव्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर नखाने ओरबडले. तेथे उपस्थित नागरिकांनी अन्सारी हिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या अन्सारीने लाथेने कदम यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर इतर पोलिसांनी हा प्रकार थांवबला. त्याचवेळी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मदत मागवण्यात आली. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांची मोबाईल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली.

हेही वाचा… “पुणे लोकसभा पोटनिवडणूक का घेतली नाही? भूमिका स्पष्ट करा, अन्यथा…”, उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला इशारा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घडलेल्या प्रकारानंतर अन्सारीला ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी कदम यांच्या तक्रारीवरून महिला पोलिसाला मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे , जखमी करणे, धमकावणे आदी विविध कलमांतर्गत अन्सारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध असून त्याद्वारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.