मुंबई : पार्सल परत करण्याच्या वादात एका डिलिव्हरी बॉयने महिला वकिलाचा विनयभंग केल्याची घटना अंधेरी येथे घडली. अंबोली पोलिसांनी या डिलिव्हरी बॉयविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
३० वर्षीय तक्रारदार वकील अंधेरीत राहते. वकिलाच्या भावाने ६ मे रोजी फ्लिपकार्ट ॲपवरून परफ्युमच्या दोन बाटल्या मागवल्या होत्या. कंपनीतर्फे सामानाचे वितरण करणारा (डिलिव्हरी बॉय) अल्ताफ मिर्झा ८ मे रोजी पावणेआठच्या सुमारास त्यांच्या घरी आला. मात्र त्यावेळी तक्रारदार महिलेचा भाऊ घरात नव्हता. भावाला पैसे पाठवायला सांगते असे बोलून तक्रारदार महिला वकिलाने अल्ताफ मिर्झाचा मोबाइल क्रमांक आणि युपीआय आयडी घेतला. काही वेळाने अल्ताफ मिर्झा परत आला.
अद्याप पैसे मिळाले नाहीत, असे बोलून त्याने वाद घातला. यावेळी महिलेने पार्सल परत केले. मात्र ते करत असताना त्याने महिला वकिलाचा विनयभंग केला. तसेच अश्लील शिविगाळ केली. घाबरून तक्रारदार महिलेलने दरवाजा बंद केला. तिचा भाऊ रात्री घरी आल्यावर तिने हा प्रकार त्याला सांगितले.
त्यानंतर त्यांनी ९ मे रोजी अंबोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी त्यांना बोलावून सविस्तर जबाब घेतला आणि प्राथमिक चौकशी केली. चौकशीनंतर अंबोली पोलिसांनी फिल्पकार्ट कंपनीचा डिलिव्हरी बॉय अल्ताफ मिर्झाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल केला.