मुंबई: आणिक आगार ते गेटवे आॅफ इंडिया मेट्रो ११ मार्गिकेस बुधवारी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. राज्याची मान्यता मिळाल्याने या मार्गिकेचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) लवकरच केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करून या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्पातील वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरसीकडे देण्यात आली आहे. त्यानुसार एमएमआरसीने मार्गिकेच्या संरेखनात बदल करून नव्याने संरेखन निश्चित केले असून आणिक आगार ते गेटवे आॅफ इंडिया अशा १७.५१ किमी लांबीची मेट्रो ११ मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला. या मार्गिकेसंदर्भातील पर्यावरण आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यासही केला. संरेखन, सामाजिक आणि पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा अहवाल प्रसिद्ध करून त्यावर सूचना-हरकती मागविल्या. त्यानुसार एमएमआरसीकडे आलेल्या सूचना-हरकतींवर सुनावणीही घेण्यात आली आहे.
या मार्गिकेच्या संरेखनास आॅगस्टमध्ये राज्य सरकारने मान्यता दिली होती आणि आता बुधवारी (३ सप्टेंबर) या मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या मार्गिकेसाठी केंद्र सरकारचीही मान्यता एमएमआरसीला घ्यावी लागणार आहे. त्यानुसार लवकरच या मार्गिकेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तेव्हा आता या मार्गिकेसाठी केंद्र सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा असेल. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ही मार्गिका मेट्रो ४ आणि ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) मार्गिकेचा विस्तार आहे. त्यामुळे मेट्रो ११ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे ते गेटवे प्रवास मेट्रोद्वारे करता येणार आहे.
अशी आहे मेट्रो ११ मार्गिका
मेट्रो ११ मार्गिकेची लांबी १७.५१ किमी अशी असून या मार्गिकेत १४ स्थानके असतील. १४ पैकी १३ मेट्रो स्थानके भुयारी असतील तर एक स्थानक जमिनीवर असेल. आणिक आगार, वडाळा आगार, सीजीएस वसाहत, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, सीएसएमटी, हॉर्निमन सर्कल आणि गेट वे ऑफ इंडिया अशी ही १४ मेट्रो स्थानके आहेत. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास यावरून सहा डब्यांची मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावेल. या मार्गिकेवरून २०३१ मध्ये दिवसाला पाच लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज एमएमआरसीने व्यक्त केला आहे.
२०५५ पर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या १० लाख १२ हजारांवर जाईल, असा दावा एमएमआरसीने केला आहे. या मार्गिकेतील कारशेड आणिक आगार आणि प्रतीक्षा नगर आगारातील १६ हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आले आहे. या मार्गिकेसाठी २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपये असा खर्च येणार आहे. त्यापैकी ३ हजार १३७ कोटी ७२ लाख रुपयांचे समभाग आणि ९१६ कोटी ७४ लाख रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज केंद्र सरकारकडून उपलब्ध करुन घेतले जाणार आहे. राज्याकडूनही दुय्यम कर्जाच्या माध्यमातून काही निधी उभारला जाणार असून उर्वरित निधी जायकाच्या माध्यमातून कर्जरुपाने उभा केला जाणार आहे.