Anil Parab : मुंबईतील वांद्रे गांधीनगर येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ मधील मोकळय़ा जागेत अनिल परब यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार विलास शेलगे नावाच्या एका व्यक्तीने २०१९ मध्ये म्हाडाकडे केली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही या बांधकामाविरोधात कारवाईची मागणी केली होती. या तक्रारींची दखल घेत मुंबई मंडळाने अवैध बांधकामाविरोधात नोटीस बजावली होती. यावरून अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेत आज थेट म्हाडा कार्यालयच गाठलं होतं. तर म्हाडा कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर अनिल परब यांनी कार्यालयाबाहेर येत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अनिल परब म्हणाले, “ मी म्हाडाला विचारलं की अनधिकृत बांधकाम कशाच्या आधारावर ठरलं जातं. अनधिकृत बांधकाम हे मूळ आराखडा जो असतो, या मूळ मान्यता असलेल्या आराखड्याच्या बाहेर जे काम केलं जातं, ते अनधिकृत असतं. तर मी त्या मूळ बांधकामाच्या नकाशाच्यी प्रत मागितलेली आहे. ती म्हाडाकडे उपलब्धच नाही. ती म्हाडाकडे नसल्यामुळे मग हे बांधकाम अनधिकृत कसं? हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून त्यांनी मला असं सांगितलं आहे की, आम्ही सगळं तपासून बघतो, आमच्या आर्किटेक्टकडे आहे का तपासतो आणि असेल तर आठ दिवसांत सादर करतो. जर मूळ बांधकामाचे नकाशे जर मला आठ दिवसांत मिळाले नाही, तर मी म्हाडावरती हक्कभंग दाखल करीन. न्यायालयात जाईन, की अशाप्रकारच्या नोटीस कुठलाही तांत्रिक आधार न घेता, हे लोक केवळ छळ म्हणून अशापद्धतीने लोकांना त्रास देत आहेत.”

हेही वाचा – “वांद्रेतील इमारत पाडली, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार?”, किरीट सोमय्यांचं अनिल परबांवर टीकास्त्र; म्हणाले, “मातोश्रीचे…”

याशिवाय, “ मी म्हाडाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. ज्या अधिकाऱ्याने मला नोटीस दिली, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे. कारण त्याने कुठलीही शहानिशा न करता नोटीस दिली होती. मी एक आमदार आहे मला नोटीस देताना त्याने शहानिशा करणे आवश्यक होते.”

हेही वाचा – “बाप जैसा बेटा, भरलो जल्दी लोटा…” ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचा चंद्रकांत खैरेंवर निशाणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “ मागील दीड वर्ष किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते आणि सांगत होते, की हे अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे. मी वारंवार त्याबाबत सांगत होतो, ही जागा माझी नाही ही जागा सोसायटीची आहे. सोसायटीचं ते कार्यालय आहे आणि ते कार्यालय वापरण्याची परवानगी मला सोसायटीने दिलेली आहे. माझं हे अनधिकृत कार्यालय आहे, असा जो किरीट सोमय्या आरोप करत होते, हा सपशेल आरोप खोटा आहे त्या संदर्भात म्हाडाने मला लेखी दिलेलं आहे. की या कार्यालयाचा आणि जागेचा या अनिधिकृत बांधकामाचा माझा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे किरीट सोमय्या आज तोंडावर आपटले आहेत.” असंही अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.