मुंबई : सण-उत्सव काळात, गर्दीच्या वेळी किंवा आपत्कालीन घटनेच्या वेळी ॲग्रीकेटरद्वारे अवाजवी भाडे आकारणी केली जात होती. मूळ भाड्याच्या किमतीत दुप्पट-तिप्पटीने भाडे आकारणी केल्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत होती.
परंतु, आता जास्त मागणीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दीड पट दर आकारता येणार नाही, असे पत्र परिवहन विभागाद्वारे उबर, रॅपिडो, ॲनी टेक्नोलॉजीस यांना दिले आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबणार आहे.
तर, ॲप आधारित वाहन चालकांना एकूण भाडेदराच्या ८० टक्के रक्कम मिळणार आहे. प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि योग्य प्रवासी दर सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परिवहन विभागाने उबर, आणि रॅपिडोसारख्या कंपन्यांद्वारे वाढीव किमत मर्यादित केली आहे.
मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १६ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार, सण, गर्दीचे तास आणि आपत्कालीन परिस्थितीसह जास्त मागणीच्या काळात ॲग्रीगेटर्सना मूळ भाड्याच्या १.५ पटीपेक्षा जास्त शुल्क आकारण्याची परवानगी दिली जाणार नाही.
आरटीओने एक सवलत मर्यादा लागू केली आहे. जी कमी गर्दीच्या वेळेत जास्तीत जास्त सवलत मूळ भाड्याच्या २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल. हे ॲग्रीगेटर्सना अनियंत्रित प्रवासी भाड्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करते. याव्यतिरिक्त, ॲग्रीगेटर्सना प्रत्येक वाहन फेरीद्वारे गोळा केलेल्या भाड्याच्या किमान ८० टक्के रक्कम चालकाला देणे बंधनकारक आहे. चालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चालकांच्या उत्पन्नात वाढ होईल.
रिक्षा आणि कॅब यासाठी आरटीओने निश्चित केलेले दर ॲग्रीकेटरला लागू होतील. टॅक्सीसाठी प्रतिकिमी २०.६६ रुपये आणि वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रतिकिमी २२.७२ रुपये दर असेल. आरटीओने सर्व ॲग्रीगेटर्सना १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ पर्यंत नवीन नियमांचे पालन करून त्यांच्या ॲपवरील दरपत्रक सुधारित करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
ओला, उबर, रॅपिडो नामक कंपन्यांनी परिवहन विभागाला वारंवार लेखी व तोंडी सरकारी दर पाळण्याचे आश्वासन दिले. परंतु , या कंपन्यानी आजतागायत त्यांच्या मोबाइल ॲप्लिकेशनवर दर लागू केलेले नाहीत. तसेच अनधिकृत बाइक टॅक्सी सुरू आहे. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी आमच्या हक्कांचे प्रवासी भाडे मिळाले नाही व बाईक टॅक्सी बंद झाली नाही. तर ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व कॅब, रिक्षा व टॅक्सी चालक महायुतीविरोधात मतदान करण्याची शपथ घेतील. – डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच.