मुंबईः आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेस सक्षम करण्यासाठी या बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या बँकेच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी राज्य बँकेवर सोपविण्यात आल्याची माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या आर्थिक अडचणीत असून गेल्या काही वर्षापासून या बँकेवर प्रशासकीय राजवट आहे. या बँकेचा परवाना संकटात आल्यामुळे बँकेला वाचविण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार बँकेला आर्थिक साह्य करण्यासोबतच आता प्रशासकाला मदत करण्यासाठी राज्य बँकेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने मार्चमध्ये अशाच प्रकारे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची `संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक केलेली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरणाचे कार्य यापूर्वीच राज्य सहकारी बँकेने सुरू केले आहे. सध्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ८५८ कोटींचा संचित तोटा आहे. या परिस्थितीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना करणे व बँकिंग व्यवहारात सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्याची मोठी जबाबदारी राज्य सहकारी बँकेने स्वीकारली आहे. सहकार क्षेत्रातील हा सुध्दा एक अभिनव प्रयोग आहे. या अंतर्गत राज्य सहकारी बँकेकडे उपलब्ध असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करून पुढील दोन वर्षामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्षम करण्याचा राज्य सहकारी बँकेचा प्रयत्न राहील, असे राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.