मुंबई : आपली सीबीआयच्या प्रमुखपदी झालेली नियुक्ती ही केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे, असा दावा सीबीआयचे संचालक आणि राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक सुबोध जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात केला आहे. आपल्या सीबीआय प्रमुखपदी झालेल्या निवडीला माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांनी वैयक्तिक द्वेष आणि सूडबुद्धीतून आव्हान दिले असून त्यांची याचिका दंड आकारून फेटाळण्याची मागणीही जयस्वाल यांनी केली आहे.

निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुमार त्रिवेदी यांनी जनहित याचिका करून जयस्वाल यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर त्रिवेदी यांच्या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकार, सीबीआय आणि सीबीआय संचालकपदी नियुक्ती झालेल्या जयस्वाल यांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, जयस्वाल यांनी याचिकेवर उत्तर दाखल करताना त्यांची सीबीआय प्रमुखपदी झालेली नियुक्ती केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात आल्याचा दावा केला आहे.

कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी दाखल काही प्रकरणांमध्ये घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगीला दोषी ठरवण्यात आले होते, तर काही प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली होती. या प्रकरणांच्या तपासासाठी जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. त्यावेळी जयस्वाल यांनी केलेल्या तपासावर विशेष न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. अशा व्यक्तीला सीबीआय संचालकपदी नियुक्त करण्यावरूनही त्रिवेदी यांनी याचिकेत प्रश्न उपस्थित केला आहे.

त्रिवेदी यांच्या या दाव्याचेही जयस्वाल यांनी प्रतिज्ञापत्रात खंडन केले आहे. या प्रकरणी सीबीआयने पुढील तपासाच्या आधारे पुरवणी आरोपपत्रे दाखल केली होती आणि त्यातील निष्कर्ष हा एसआयटीच्या निष्कर्षाशी साधर्म्य साधणारा होता. तपासातील निष्कर्ष विसंगत असता तर सीबीआयने एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर आवश्यक कायदेशीर कारवाई केली असती, असा दावाही जयस्वाल यांनी केला आहे. 

नियुक्तीबाबतची वस्तुस्थिती केंद्र सरकारच विशद करू शकेल

आपली सीबीआय संचालकपदी नियुक्ती का करण्यात आली याबाबतची वस्तुस्थिती केंद्र सरकार आणि सीबीआयच योग्य प्रकारे विशद करू शकते, असेही जयस्वाल यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी याचिका

आपली प्रतिष्ठा मलीन करण्याच्या आणि आपल्याला विनाकारण कायदेशीर लढायांमध्ये अडकवून ठेवण्याच्या हेतुने त्रिवेदी यांनी ही याचिका केली आहे. आपली राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्यावरही त्रिवेदी यांनी अशाच प्रकारची याचिका केली होती, असा दावाही जयस्वाल यांनी केला आहे.

म्हणून सूडबुद्धीने याचिका

निवृत्तीआधी त्रिवेदी हे त्यांच्या बदलीच्या ठिकाणाबाबत नाखुष होते. शिवाय त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही झाली होती. त्यामुळे त्यांचा आपल्यावर विशेष राग असल्याचे आणि त्यातूनच ही याचिका केल्याचा दावाही जयस्वाल यांनी केला आहे.