मुंबई : राज्य सरकारने अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन बाधितांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती. पण, आजवर एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. आता पात्र शेतकऱ्यांना उर्वरित एका हेक्टरची मदत मिळणार आहे, त्यासाठी सरकारने ६४८ कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे.

अतिवृष्टी बाधितांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे जाहीर केले होते. पण राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषात दोन हेक्टरची मर्यादा असल्यामुळे आजवर अतिवृष्टी बाधितांना मिळालेली मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत होती. आता उर्वरित एका हेक्टरला मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपत्ती आणि पुनर्वसन विभागाने सोमवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, नवे लेखाशिर्ष उघडण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत केलेल्या ज्या खातेदारांना जमीन तीन हेक्टरपर्यंत क्षेत्र असेल, अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली. मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून एकूण ८,१३९ कोटी इतक्या रक्कमेचे शासन निर्णय निर्गमित केल्याचेही मंत्री जाधव म्हणाले.

सहा लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार

सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील ६ लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांचे ६ लाख ५६ हजार ३१० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. या शेतकऱ्यांना यापूर्वीच दोन हेक्टरपर्यंतची मदत मंजूर करण्यात आली असून, ही वाढीव मदत अतिरिक्त एक हेक्टरसाठी आहे.