मुंबई : महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन व अभ्यास करता यावा, म्हणून शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातर्फे पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याला शाहीर साबळेंचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली.
महाराष्ट्राला प्रयोगात्मक’ कलांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने अकृषी विद्यापीठातील प्रयोगात्मक कलांच्या विभागांकडून लोककलांचे सर्वंकष ध्वनिचित्र मुद्रण स्वरूपात केलेले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडे नाटक, लोककला, संगीत, नृत्य अशा विविध प्रयोगात्मक कलांची माहिती उपलब्ध आहे. पण त्याचे वर्गीकरण विश्लेषण व संशोधन होणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग राज्यातील आणि अन्य राज्यातील पदवी, पदव्युत्तर व पीएचडी करणाऱ्या विदयार्थ्यांना अभ्यासासाठी होईल. या संशोधन केंद्राचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे निर्देश शेलार यांनी विभागाला दिले.
प्रयोगात्मक कला हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यात जडणघडणीचे ऐतहासिक संदर्भ दडलेले आहेत. त्यावर संशोधन व अभ्यास होण्याची गरज आहे. शाहीरी, पोवाडा, जागरण, गोंधळ, तमाशा व वगनाट्य, नाटक, दशावतार, भारुड, नाटक, कीर्तन आदी कलांना प्रचंड मोठी परंपरा आहे. त्यांच्यामध्ये जगण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असून ते जगामोर उलगडून दाखविणे आवश्यक आहे. त्यासाठी संशोधन व या कलांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याने स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे शेलार यांनी नमूद केले.
राज्य पुराभिलेख संचालनालयाने गुजरातशी करार करावा
बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे स्थान आणि महाराष्ट्राचे दृढ ऋणानुबंध होते. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवजांची देवाणघेवाण होणे आवश्यक असून राज्य पुराभिलेख संचालनालयाने गुजराच्या संबंधित विभागाशी सामंजस्य करार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे दिले.
महाराज गायकवाड यांना घडविणाऱ्या मातोश्री महाराणी जमनाबाई ‘गायकवाड यांचे माहेर सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरमध्ये आहे. प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राजा आणि राज्य घडविणाऱ्या जमनाबाई राणीसाहेब यांच्यामुळे सयाजीराव गायकवाड यांचे नेतृत्व घडले व संस्थानाचा नावलौकिकही सर्वदूर पोचला. त्यामुळे रहिमतपूर येथे त्यांचे स्मारक व परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या स्मारकाबाबत आराखडा सादर करण्याचे निर्देश शेलार यांनी दिले.