महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेतील भुकंपानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या मेळाव्यांमधून विरोधी गटांवर काय आणि कोणत्या प्रकारे आरोप केले जाणार याची सर्वांमध्ये चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला आहे.

“काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!, सगळा गोंधळ घालून बघा घड्याळ कसे नामानिराळे संसार तिघांचा प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले. काय तो भारतजोडो…काय तो पेंग्विन सेनेचा दसरा…शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे.” असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

याशिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आज प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…” ; बावनकुळेंचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या. त्यामध्ये कधी ते महाराष्ट्राच्या हिताचं काही बोललेच नाही. पुन्हा टोमणे सभा होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असे कार्यकर्ते आहेत, जे दिवसाचे १८ तास समर्पित आहेत. ते दोघेही नेहमीच विकासाबाबत विचार करतात. दसरा मेळाव्यात काय अपेक्षित आहे तर, महाराष्ट्राचा सकल विकास कसा होईल, महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर कसा पोहचेल. हे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतच्या दसरा मेळाव्यातील सभांमध्ये केवळ टोमणेच दिसले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही.” असं बावनकुळे म्हणाले आहेत.