समीर वानखेडे प्रकरणावरुन आता राज्यामधील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामध्ये जुंपली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाच्या नेत्याचे ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याचे आरोप केल्यानंतर आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी गुरुवारी आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं ट्विट केलं होतं. त्यावरही शेलार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे हस्यास्पद असल्याचं शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी एखाद्या प्रकरणाचा तपास सुरु असेल आणि पुराव्यांशी सत्ताधारी छेडछाड करत असतील तर हा गुन्हा असल्याचं मी मानतो, असंही म्हटलंय. नवाब मलिक यांचे डायलॉग फुसके आहेत, असा टोला शेलार यांनी लगावला आहे. तर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रासंदर्भात बोलताना शेलार यांनी, मराठी मुलीने तिचं म्हणणं मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलं तर लोकांच्या का पोटात दुखत आहे?, असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच एका मराठी मुलीवर सत्ताधारी लोक कशी वक्तव्य करत आहेत हे संपूर्ण जग पाहत असल्याचंही शेलार म्हणालेत.

हे सरकार अकार्यक्षम झालं आहे असं म्हणतानाच, हिवाळी अधिवेशनाआधीच राष्ट्रवादीच्या किती लोकांना हुडहुडी भरते हे येणारा काळच सांगेल, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे. मलिक यांनी यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचं म्हटलं असून त्यावरच शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी ड्रॅग्ज करून रिपोर्ट टाकला होता मग नवाब मलिक यांनी देखील ड्रग्ज टेस्ट करून दाखवावी, असा उपरोधिक टोला शेलार यांनी लगावला आहे.

आर्यनला बेल मिळाल्यानंतर अजून बरंच काही बाकी आहे अशा अर्थाचं ट्विट केल्यावरुन प्रश्न विचारला असता शेलार यांनी, “अजून जर पिक्चर बाकी असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की, चल हट हवा येऊ द्या,” अशी प्रतिक्रिया दिलीय. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या यांना सत्तेतील लोकं इतकी का घाबरत आहेत?, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.