मुंबई: शेतकरी प्रश्नावर विरोधी पक्षांने विधानसभे उपस्थित केलेल्या चर्चेवर उघड नाराजी व्यक्त करताना, ‘विरोधकांचे शेतकरी प्रेम म्हणजे नक्राश्रू’ असल्याचे वक्तव्य करणाऱ्या तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शुक्रवारी विरोधकांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही तुपे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत विधानसभा अध्यक्षांच्या आसनाचा उपयोग राजकीय हेतूने केला जाणार नाही याचे भान तालिका अध्यक्षांनी ठेवण्याची समज दिली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीने गुरुवारी चर्चा उपस्थित करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगली असनाना बहुतांश सदस्य निघून गेले होते. त्यामुळे नाराज झालेल्या तालिका सभाध्यक्ष तुपे यांनी विरोधी पक्षातील सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षाने शेतकऱ्यांसंबंधी हा प्रस्ताव आणला होता. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यात राजकारण येता कामा नये अशी भूमिका मांडली. परंतु काही सन्माननीय सदस्यांनी त्यावर खोचक अशा प्रतिक्रियाही नोंदविल्या.
विरोधकांनी ३ दिवस गोंधळ घातला आणि हा प्रस्ताव आणला आणि आजही लक्षवेधी सूचना न होऊ देता हा प्रस्ताव चर्चेला घ्या, असा आग्रह धरला. शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसतो आणि त्याच्या ताटात वाढले गेले पाहिजे, अशी भूमिका सरकारने घ्यावी. सरकार पक्षाचे मंत्री आणि सर्वजण या चर्चेसाठी उपस्थित आहेत. पण स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायला मात्र विरोधक तयार नव्हते. भूक लागल्यावर जो तो निघून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणे किती आवश्यक आणि किती राजकारणी व नाटकी आहे, हे या सर्व प्रकरणातून दिसते असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. पण दुर्दैवाने चर्चेसाठी नावे देणारे सदस्य उपस्थित नाहीत. त्यामुळे नक्की काय समजायचे. १३ तास आपण सभागृहात आहे. मग ज्यांनी प्रस्ताव आणला ते का बसू शकत नाहीत अशी विचारणा करीत, शेतकऱ्यांच्या विषयावर चांगल्या सूचना कोणत्या येत आहेत आणि शेतकरी हिताचे उद्या आपल्याला काय बोलायचे आहे, हे का ऐकू शकत नाहीत, हा प्रश्न अध्यक्ष म्हणून मलाही पडला आहे. त्यामुळे हे नक्राश्रु सुरु आहेत की काय, विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे की काय अशी विचारणा करीत तुपे यांनी विरोधी पक्षांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना(ठाकरे) विधानसभा नेते भास्कर जाधव, नाना पटोले यांनी तुपे यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. तुपे यांनी अध्यक्षांच्या आसनावर बसून राजकीय वक्तव्य करुन आसनाचा आणि सभागृहाचा अवमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनीही तुपे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत या प्रकरणात आपल्या दालनात सर्व माहिती घेऊन उचित निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तसेच आपल्या आसनाचा राजकीय वापर वापर होणार नाही याचे भान ठेवण्याच्या सूचनाही तालिका अध्यक्षांना दिल्या.