मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका प्रसविकांना ग्रेड पे ४२०० रुपये पूर्वलक्षी प्रभावाने कालबद्ध पदोन्नती लागू करण्याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे ४०० परिचारिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यांसदर्भात परिचारिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे याबाबत मुंबई महानगरपालिका शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास २५ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या परिचारिकांनी दिला आहे.

हेही वाचा >>> म्हाडाच्या पुणे मंडळाच्या क्षेत्रातील ६,२९४ घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात, ५ डिसेंबर रोजी सोडत

मुंबईतील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये नवजात बालकापासून १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलाचे लसीकरण, हिवताप, डेंग्यू रुग्ण शोधणे, रक्तदाब, मधुमेह, क्षयरोगाचे रुग्ण शोधणे, जन्म, मृत्यू नोंद ठेवणे, गरोदर मातांना मार्गदर्शन करणे, नवविवाहित दाम्पत्यांना कुटुंब नियोजनाची माहिती देणे अशी विविध कामे सहाय्यक परिचारिका प्रसविका आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून करीत असतात. १० हजार लोकसंख्येमागे एक सहाय्यक परिचारिका प्रसविकेची नियुक्ती करण्यात आली आहे. आशा स्वयंसेवक व आरोग्य स्वयंसेविका यांच्या मदतीने या प्रसविका कामाचे नियोजन करतात. मात्र या सहाय्यक परिचारिका प्रसविकांना मागील सहा वर्षांपासून कालबद्ध पदोन्नती देण्यास मुंबई महानगरपालिका प्रशासने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सहाय्यक परिचारिका प्रसविकांनी ९ ऑक्टोबर रोजी दि म्युनिसिपल युनियनच्या नेतृत्वाखाली कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या एफ/दक्षिण विभागातील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

हेही वाचा >>> वांद्रे येथील पटवर्धन उद्यानाखालील भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान,  ४२०० रुपये ग्रेड पेनुसार त्वरित योग्य कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत सामान्य प्रशासनाच्या उप आयुक्तांसोबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीमध्ये दिले. शिष्टमंडळामध्ये युनियनचे अध्यक्ष शशांक राव, उपाध्यक्ष रंगनाथ सतावसे, नरेश चौहान, सहाय्यक सरचिटणीस विनायक साळवी आणि परिचारिकांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता, अशी माहिती दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास २५ ऑक्टोबरपासून सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागातील सर्व सहाय्यक परिचारिका प्रसविका बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला. तसेच याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.